समाजमाध्यमांवर रोज बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओनं भारताच्या पंजाबमधील ९२ वर्षीय आजोबांची त्यांच्या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भाच्याशी भेट घडवून दिली आहे. पाकिस्तानातील ऐतिहासिक करतारपूर गुरुद्वारा साहिब परिसरात भारत-पाक फाळणीनंतर तब्बल ७५ वर्षांनंतर या दोघांची भेट झाली आहे. फाळणीनंतर सरवान सिंग यांनी पहिल्यांदाच आपल्या भावाचा मुलगा मोहन सिंग ऊर्फ अब्दुल खालिद याला पाहिले. अब्दुलला मिठीत घेतल्यानंतर दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. या भावनिक क्षणी दोन्ही कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
खालिदने काकांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीवेळी दोन्ही कुटुंबीयांनी काका-भाच्यावर फुलांचा वर्षाव केला. चार तासांच्या या भेटीत दोघांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दोन्ही देशांची संस्कृती आणि राहणीमान देखील समजून घेतले. “आम्ही आमच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. तब्बल ७५ वर्षांनंतर हे दोघे भेटले ही केवळ देवाचीच कृपा आहे”, अशी प्रतिक्रिया खालिद यांचे नातेवाईक जावेद यांनी या भावनिक भेटीनंतर दिली. व्हिसा मिळाल्यानंतर सिंग यांनी काही काळ आपल्या भाच्याकडे राहायला यावं, असं आमंत्रणही जावेद यांनी दिलं.
हे दोघे कसे भेटले?
काका-भाच्याच्या या भेटीमागे भारत आणि पाकिस्तानातील यूट्यूबर्सचं मोठं योगदान आहे. काही दिवसांपूर्वी जलंधरमधील एका यूट्यूबरनं भारत-पाक फाळणीमुळे प्रभावित झालेल्या काही कुटुंबांची डॉक्युमेंट्री बनवली होती. यात सरवान सिंग यांची कहाणी या यूट्यूबरनं प्रकाशित केली होती. तर दुसरीकडे पाकिस्तानातील एका यूट्यूबरनं अब्दुल खालिद यांची आपबीती त्याच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केली होती. योगायोगाने फाळणीच्या या दोन्ही कहाण्या ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका पंजाबी व्यक्तीने पाहिल्या. या व्यक्तीने दोन्ही कुटुंबांशी संपर्क साधून त्यांची भेट घडवण्यासाठी प्रयत्न केले.
पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानमधील बहिणीने भावासाठी यंदाही पाठवली राखी; म्हणाल्या, “२०२४ मध्ये…”
हाताच्या दोन अंगठ्यांमुळे पटली ओळख…
यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सरवान सिंग यांनी आपल्या भाच्याच्या एका हाताच्या पंजाला दोन अंगठे असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय मांडीवर एक मोठा तीळ असल्याची खुणही सरवान यांनी सांगितली होती. या खुणा पाकिस्तानी यूट्यूबरने पोस्ट केलेल्या व्हिडिओतील व्यक्तीशी जुळत होत्या. ही बाब लक्षात येताच ऑस्ट्रेलियातील पंजाबी व्यक्तीने दोन्ही कुटुंबाशी संपर्क साधून त्यांची भेट घडवून आणली.
फाळणीच्या जखमा ७५ वर्षांनंतरही ताज्या…
भारत-पाक फाळणीपूर्वी सरवान सिंग कुटुंबीयांसमवेत पाकिस्तानातील चाक ३७ या गावामध्ये राहत होते. त्याकाळी सिंग यांच्या कुटुंबात एकुण २२ व्यक्ती एकत्र राहत होत्या. फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक दंगली भडकल्या. या दंगलींमध्ये सिंग यांच्या कुटुंबातील २२ सदस्यांना ठार करण्यात आलं. या तणावग्रस्त वातावरणात सरवान सिंग इतर नातेवाईकांच्या मदतीने सीमा पार करुन भारतात आले. हिंसाचारातून बचावलेला खालिद मात्र पाकिस्तानातच राहिला. पाकमधील एका मुस्लीम कुटुंबाने खालिद यांचे पालनपोषण केले. त्यानंतर मूळच्या मोहन सिंगला अब्दुल खालिद हे नवीन मुस्लीम नाव मिळालं. घटनेवेळी खालिद केवळ सहा वर्षांचे होते.
‘काश्मीर’ मुद्द्यावरून चीनचे भारत-पाकिस्तानला आवाहन; म्हणाले, “वाद मिटवण्यासाठी…”
काही काळ मुलासोबत कॅनडामध्ये राहिल्यानंतर सध्या सरवान सिंग जलंधरमधील संधमान गावात आपल्या मुलीकडे राहतात. पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यातील रावी नदीच्या काठावर करतारपूर साहिब गुरुद्वारा आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी आयुष्यातील शेवटचे १८ वर्ष याच ठिकाणी व्यतीत केले होते. यामुळे भारत-पाकमधील शिखांची या स्थानावर श्रद्धा आहे. भारतीय यात्रेकरुंना या गुरुद्वाराच्या दर्शनासाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची परवानगी आहे.