H-1B Visa Beneficiaris From India: अमेरिकेने १९९० साली एच-१बी व्हिसा कार्यक्रम सुरू केला. यामुळे जगभरातील कुशल मनुष्यबळ अमेरिकेला मिळाले आणि त्यांनी तेथील तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलॉन मस्क हेदेखील एच-१बी व्हिसाचे लाभार्थी आहेत. ते दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत गेले होते. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जगभरातून अनेक तंत्रकुशल कर्मचारी आले आणि त्यांनी एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग अशा क्षेत्रात भरीव कामगिरी केली. अलीकडेच एच-१बी व्हिसावर ट्रम्प प्रशासनाने एक लाख डॉलर्सचे शुल्क लादल्यामुळे आता या विषयाची चर्चा होत आहे.
एच-१बी व्हिसाचा सर्वाधिक वापर भारतीय कर्मचाऱ्यांनी केला. मागच्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार अमेरिकेकडून दरवर्षी ८५ हजार व्हिसासाठी लॉटरी काढली जाते. यात ७० टक्के वाटा एकट्या भारताचा असतो. भारतातून अमेरिकेत गेलेल्या अनेकांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर तेथील आयटी क्षेत्रात नाव कमावले आहे. अशा काही लोकांबद्दल जाणून घेऊ.
सुंदर पिचाई
सुंदर पिचाई हे विद्यार्थी म्हणून अमेरिकेत गेले होते. त्यानंतर त्यांनी एच-१बी व्हिसाचा आधार घेत तिथेच गुगलमध्ये नोकरी पत्करली. गेल्या काही वर्षांत गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ बनले. एआय, गुगल क्लाउड, पिक्सल फोन यासारख्या उत्पादनांसाठी त्यांनी मेहनत घेतली. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगला मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदल करता आले.

सत्या नाडेला
सत्या नाडेला १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेत गेले. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यासाठी त्यांनी एच-१बी व्हिसा मिळवला. २०१४ साली ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले. मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड कम्प्युटिंग, एआय आणि इतर विभागासाठी नाडेला यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एच-१बी व्हिसामुळे मायक्रोसॉफ्टला अनेक कुशल मनुष्यबळाचा पुरवठा झाला, हे यातून दिसून येते.

अरविंद श्रीनिवास
विद्यार्थीदशेत असताना अरविंद श्रीनिवास अमेरिकेत आले. पुढे एच-१बी व्हिसाचा वापर त्यांनी एआय संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी केला. २०२२ मध्ये श्रीनिवास यांनी डेनिस यारात्स, जॉनी हो व अँडी कोन्विन्स्की यांच्यासोबत मिळून Perplexity AI ची स्थापना केली. ही कंपनी एआय आधारित सर्च इंजिन विकसित कऱण्यावर लक्ष केंद्रित करते. अरविंद श्रीनिवास यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी. टेक आणि एम. टेकचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले इथून संगणक विज्ञानातील पीचएचडी प्राप्त केली.

Perplexity AI या कंपनीचे मूल्य ९ अब्ज डॉलर्स इतके आहे. हल्लीच गुगलचे क्रोम ब्राऊजर विकत घेणार असल्यामुळे श्रीनिवास यांची कंपनी चर्चेत आली होती.