H1B Visa Doctors Fee Exemption: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची सध्या चर्चा सुरू आहे. याआधी मागील काही महिन्यांपासून आयातशुल्काच्या निर्णयांची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता एच-१बी व्हिसाबाबत अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन एच-१बी व्हिसासाठी तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ८८ लाख रुपये शुल्क देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, एच-१बी व्हिसाबाबत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या एच-१बी व्हिसाच्या एक लाख डॉलरच्या शुल्कामधून डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अमेरिका सूट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील संकेत व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून मिळाले आहेत. ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या एका निवेदनात व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी हे संकेत दिले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
टेलर रॉजर्स यांनी म्हटलं की, “घोषणापत्र संभाव्य सूट देण्यास परवानगी देतं. ज्यामध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जे येथे रहिवासी आहेत, यांचा समावेश असू शकतो.” दरम्यान, अमेरिकेच्या या एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीच्या निर्णयामुळे काही रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता वाढेल अशी चिंता रुग्णालये आणि वैद्यकीय संघटनांकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून डॉक्टरांना ‘एच-१बी’ व्हिसाच्या एक लाख डॉलरच्या शुल्कातून सूट देण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत.
अमेरिकेच्या काही दुर्गम भागात काम करण्यासाठी विदेशी प्रशिक्षित डॉक्टरांवर अवलंबून असलेल्या रुग्णालयांसाठी एच १बी व्हिसा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातो. अनेक आरोग्य व्यवस्था वैद्यकीय रहिवासी आणि तज्ञांना आणण्यासाठी व्हिसावर अवलंबून असतात. आरोग्य संशोधन संघटना केएफएफने संकलित केलेल्या काही आकडेवारीनुसार सध्या ७६ दशलक्षाहून अधिक अमेरिकन लोक अशा ठिकाणी राहतात जिथे अधिकृतपणे प्राथमिक काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची कमतरता असल्याचं म्हटलं जातं.
तसेच अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष बॉबी मुक्कामाला यांनी इशारा दिला की व्हिसाच्या शुल्कवाढीमुळे विशेषतः ग्रामीण भाग आणि वंचित समुदायांमध्ये उच्च प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता जाणवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांनी असंही म्हटलं की, आंतरराष्ट्रीय पदवीधर आमच्या डॉक्टरांच्या कार्यबलाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.”