काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी थेट भारतीय हवाईदलाच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीवर (Internal Computer System) सायबर हल्ला करून ही प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. हवाईदलाची संवेदनशील माहिती चोरणे हे या सायबर हल्ल्याचं मुख्य उद्दीष्ट होतं. परंतु, सायबर हल्लेखोर यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु, हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला कुठून केला? याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
हॅकर्सने गुगलच्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या मदतीने बनवलेल्या ओपन सोर्स मालवेअरद्वारे हा हल्ला केला होता. एक ईमेल पाठवून महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हवाई दलाची माहिती मिळवण्यात हल्लेखोर अपयशी ठरले. तसेच सर्व डेटा सुरक्षित असल्याचं हवाई दलाने म्हटलं आहे.
दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी सायबलला (Cyble) १७ जानेवारी रोजी गो स्टीलर मालवेअरचा प्रकार आढळला आहे. हा मालवेअर गिटहबवर (GitHub) सार्वजनिकरित्या उपलब्ध होता. याच मालवेअरच्या माध्यमातून हॅकर्सने भारतीय हवाई दलाच्या संगणकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्याचा हा प्रयत्न कधी केला, हेदेखील समजू शकलं नाही. काही अमेरिकन वृत्तपत्रांनी दावा केला आहे की, १७ जानेवारी रोजीच हा हल्ला झाला होता.
हवाई दलातील सूत्रांनी सांगितलं की, भारतीय हवाई दलाचा कोणत्याही प्रकारचा डेटा चोरीला गेला नाही. मालवेअर हल्ला अपयशी ठरला आहे. हवाई दलाची संगणकीय प्रणाली सुरक्षित आहे. तसेच आपल्याकडे उत्तम फायरवॉल सिस्टिमदेखील आहे. आपली फक्कम फायरवॉल सिस्टिम अशा कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून आपला डेटा सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे.
हे ही वचा >> कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशताद्यावर हल्ला, हरदीपसिंह निज्जरच्या मित्राच्या घरावर गोळीबार
सायबर हल्लेखोरांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १२ फायटर जेट्सच्या खरेदीचा बनाव रचत रिमोटली-कंट्रोल्ड ट्रोजन अटॅकची योजना आखली होती. त्यांनी त्यावेळी Su-30_Aircraft Procurement नावाची ZIP बनवली होती. त्यानंतर ही फाईल भारतीय हवाई दलाच्या संगणकांमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीदेखील हे सायबर हल्लेखोर हवाई दलाचा संगणक हॅक करू शकले नव्हते.