पीटीआय, उत्तरकाशी
उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेल्या ढगफुटीचा फटका धराली गावाला बसला असून, किमान निम्मे गाव ढगफुटीनंतर वाहत आलेल्या गाळाखाली, पाण्याखाली दबले गेले आहे. बुधवारी एक मृतदेह या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आला, तर १९० हून अधिक जणांची सुटका बचाव पथकांनी केली. केरळमधील २८ पर्यटकांचा गट बेपत्ता आहे. या ठिकाणी पाऊस सुरूच असून, बचाव पथकांसमोर बेपत्ता नागरिकांना शोधण्याचे मोठे आव्हान आहे.
भूस्खलनामुळे धराली गावाकडे येणारे रस्ते बंद झाले आहेत. बेपत्ता लोकांमध्ये शेजारील हर्सिल भागातील लष्करातील ११ जणांचाही समावेश आहे. केरळमधील बेपत्ता नागरिकांपैकी एकाच्या नातेवाईकाने सांगितले, की पर्यटक उत्तरकाशीहून गंगोत्रीकडे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास निघाले होते. वाटेत भूस्खलनामुळे ते अडकले असावेत. त्यांच्याशी आता संपर्क होत नाही. या घटनेत चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
गंगोत्रीकडे जाताना धराली गाव हा मुख्य थांबा आहे. अनेक हॉटेल, निवासस्थाने या ठिकाणी आहेत. धरालीमधील एकाने सांगितले, ‘धरालीमध्ये माझा छोटा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगा आहेत. आमचे त्या ठिकाणी हॉटेल आहे. सर्व काही वाहून गेले. मंगळवारी दुपारी २ वाजता त्याच्याशी अखेरचा संवाद झाला.’
जळगावमधील १९ पर्यटक अडकल्याची भीती
जळगाव : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे जळगावमधील एका जवानासह १९ जण अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. अडकलेल्या पर्यटकांपैकी तिघांशी संपर्क साधण्यात आला असला, तरी उर्वरित १६ पर्यटकांशी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही. धराली गावात जळगावमधून काही पर्यटक गेले होते. पाचोरा तालुक्यातील जवान सोपान अहिरे हे घटनास्थळी कर्तव्यावर होते. त्यांच्याशी देखील संपर्क होऊ शकलेला नाही. जळगाव शहरातील तीन जणांशी संपर्क झाला आहे. उर्वरित पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.