वृत्तसंस्था, तेल अविव
गाझा युद्धसमाप्तीसाठी आवश्यक असलेल्या अटीची पूर्तता झाल्यानंतर, म्हणजेच इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता केल्यानंतर आणि हमासने इस्रायलच्या ओलिसांची सुटका केल्यानंतर गाझामध्ये पुढे काय होईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक गुंतागुंतीचे मुद्दे सुटलेले नाहीत. गाझामध्ये प्रशासन कुणाचे राहील, हमास निःशस्त्र होईल का, या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.
हमासने २० ओलिसांची सुटका केली असली, तरी २४ मृत ओलिसांचे पार्थिव इस्रायलकडे सुपूर्द केलेले नाही. हमासने केवळ चार जणांचे पार्थिव इस्रायलला परत दिले आहेत. त्यातील दोघांची ओळख पटली आहे. एकाचे नाव गाय इलौझ, तर दुसरा नेपाळमधील विद्यार्थी बिपिन जोशी आहे. दोघांचेही वय २० च्या आसपास आहे. हमासने मुक्त केलेले ओलीस सध्या वैद्यकीय केंद्रात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा काळ लागणार आहे. इस्रायलने सोडलेल्या अनेक कैद्यांवर वेस्ट बँक आणि गाझा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इस्रायलचा गोळीबार
उत्तर गाझामध्ये इस्रायली सैनिकांच्या दिशेने, ‘यलो लाइन’कडे येणाऱ्या अनेक लोकांवर इस्रायलच्या सैनिकांनी गोळीबार केला. सैन्याला धोका वाटला, म्हणून गोळीबार केल्याचे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. या घटनेत किती जण मृत्युमुखी पडले, हे समोर येऊ शकले नाही. युद्धविरामाच्या करारानुसार, इस्रायलचे सैन्य ऑगस्ट महिन्यात गाझा येथे ज्या ठिकाणी होते, तिथपर्यंत माघारी जाणार आहे. ते जिथपर्यंत माघारी जातील, त्या रेषेला ‘यलो लाइन’ संबोधले आहे.