America : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशातच आता एका नवविवाहित वधूने तिची अमेरिकेतील वेदनादायी कहाणी सांगितली आहे. ही नवविवाहित तरुणी पॅलेस्टिनी नागरिक आहे. ती जवळपास चार महिन्यांपेक्षा जास्त काळ अमेरिकेच्या इमिग्रेशन कोठडीत होती. या तरुणीने तिला आलेला दुःखद अनुभव शेअर करत गंभीर आरोप केले आहेत.

या नवविवाहित वधूने सांगितलं की तिला अमेरिकन सरकारने हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तिला प्राण्यांसारखी वागणूक देण्यात आल्याचा आरोप तिने केला. तसेच तिचं म्हणणं आहे की, तिला अमेरिकेच्या इमिग्रेशन कोठडीत बंदिवस्त ठेवत तब्बल पाच महिने हातात बेड्या होत्या. त्या बरोबरच १६-१६ तास अन्न आणि पाणी देण्यात येत नव्हतं. प्राण्यांसारख वागवण्यात आलं. वार्ड साकीक (२२ वय) असं या तरुणीचं नाव आहे. या संदर्भातील वृत्त एबीसी न्यूजच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वार्ड साकीक ही तरुणी फेब्रुवारीमध्ये यूएस व्हर्जिन आयलंडमधून हनिमूनवरून परतत होती, तेव्हा तिला इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (ICE) तिला ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून ती आतापर्यंत तुरुंगात होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही या आठवड्याच्या सुरुवातीला तिची सुटका होईपर्यंत ती तब्बल १४० दिवस तुरुंगात राहिली. वार्ड साकीक ही तरुणी तिच्या पतीबरोबर हनिमून साजरा करण्यासाठी व्हर्जिन आयलंडला गेली होती.

तिने सांगितलं की जेव्हा ती तिच्या हनिमूनवरून परतत होती, तेव्हा तिला मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. ती म्हणाली की, “मी माझ्या आयुष्यातील पाच महिने गमावले. कारण मला गुन्हेगार ठरवण्यात आलं होतं. माझ्याकडून मानवता हिरावून घेण्यात आली.” दरम्यान, तिला ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकन सरकारने तिला दोनदा हद्दपार करण्याचा प्रयत्न केल्याचंही तिने सांगितलं.

पहिल्यांदा तिला इस्रायलच्या सीमेवर नेण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्याच वेळी इस्रायल आणि इराणचा संघर्ष सुरु होता. दुसऱ्या वेळी अधिकाऱ्यांनी पुन्हा तिला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हाच न्यायाधीशांनी तिला टेक्सासमधून बाहेर काढण्यास स्पष्टपणे मनाई करण्याचा आदेश दिला होता, पण तरीही तिला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. ती म्हणाली की, “मला प्राण्यांसारखी वागणूक देत अमेरिकन सरकारने मला जगाच्या अशा भागात फेकण्याचा प्रयत्न केला जिथे मला माहित नाही की मी कुठे जात आहे”, असं वार्ड साकीकने सांगितलं.

द गार्डियनच्या एका वृत्तानुसार, वार्ड साकीक हिचा जन्म सौदी अरेबियात मूळ गाझा येथील कुटुंबात झाला होता. परंतु परदेशी नागरिकांच्या मुलांना राज्य नागरिकत्व देत नसल्याने ती २०११ मध्ये तिच्या कुटुंबासह पर्यटक व्हिसावर अमेरिकेत दाखल झाली. नंतर कुटुंबाने आश्रयासाठी अर्ज केला. त्यानंतर तिला पर्यटक व्हिसावर देशात राहण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच तिने आर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून पदवी मिळवलेली आहे. तसेच एक यशस्वी लग्न फोटोग्राफी व्यवसाय देखील ती करते. या वर्षाच्या सुरुवातीला तिने २८ वर्षीय अमेरिकन नागरिक ताहिर शेखशी लग्न केलं आणि ग्रीन कार्डसाठी अर्ज केला. तिच्या अर्जाचा पहिला टप्पा ती तुरुंगात असतानाच मंजूर करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तिच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, आयसीईने तिला पुन्हा एकदा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न न्यायालयाच्या आदेशाचे आणि पॅलेस्टिनींसाठीच्या डिफर्ड अँड फोर्स्ड डिपार्चर (डीईडी) धोरणाअंतर्गत असलेल्या संरक्षणाचं उल्लंघन आहे. तिला अमेरिकेच्या प्रदेशात प्रवास करण्याचा अधिकार होता, जे तिने केले, असं तिच्या वकिलांनी म्हटलं आहे.