बांगलादेश सध्या जगभरामध्ये दोन गोष्टींसाठी चर्चेत आहे. पहिली म्हणजे अनपेक्षितपणे टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडकडून झालेल्या पराभवामुळे आणि दुसरा या देशामध्ये सुरु असणाऱ्या हिंसाचारामुळे. याच दोन गोष्टींची सांगड घालत बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मुशरफ मुर्तझाने सध्या मायदेशामध्ये सुरु असणाऱ्या हिंसेचा निषेध केला आहे. हिंदू अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले हे निषेधार्ह असल्याचं मुर्तझाने म्हटलं आहे.

बंगाली भाषेमध्ये मुर्तझाने आपल्या फेसबुक पेजवर एका फोटोसहीत आपलं मत व्यक्त केलंय. बांगलादेशचा दोनदा पराभाव झालाय. एक टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडने पराभूत केलं तेव्हा आणि एक पराभव घरी (मायदेशी) झालाय, असं मुर्तझा म्हणालाय. रविवारी बांगलादेशमधील रंगपूरमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर त्याने या हिंसेमध्ये जाळण्यात आलेल्या घरांचा फोटो पोस्ट करत नाराजी व्यक्त केलीय. या हल्ल्यात हिंदूंची २० घरं जमावाने जाळून टाकली.

“काल दोन पराभव झाले. एक बांगलादेश क्रिकेट संघाचा पराभव झाला जो फार वेदनादायी होता. दुसरा पराभव हा बांगलादेशचाच झाला ज्यामुळे माझ्या काळजाला छेद गेलाय. हा तो हिरवा आणि लाल झेंडा (बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज) नाही जो आपल्याला हवाय. किती सारी स्वप्नं, किती सारे कष्टाने मिळवलेले विजय एका क्षणात नाहीसे झाले. अल्लाह आपल्याला यामधून मार्ग दाखवो हीच इच्छा,” असं मुर्तझाने म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन आठवड्यांपासून बांगलादेशमधील वेगवेगळ्या भागांमधून हिंदूविरोधातील हिंसेच्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनाही घडल्यात. रविवारी येथील रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर जमावाने हल्ला करुन त्यापैकी २० घरं पेटवून दिली. मागील आठवड्यामध्ये नानूअर दिघी तलावाजवळ नवरात्रीनिमित्त दुर्गेची प्रतिष्ठापना केलेल्या मंडपामध्ये तीन जणांची हत्या करण्यात आली.