Punjab fake engagement scamकॅनडात लग्न करून परदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न अनेक पंजाबी तरुणांच्या डोळ्यात असतं. या स्वप्नाचा फायदा घेत, एका माय-लेकीनं पंजाबात चक्क साखरपुड्यांची रांगच लावली! कधी व्हिडिओ कॉलवरून, तर कधी फोटोला हार घालून, गेल्या दोन वर्षांत सात तरुणांनी हरप्रीत कौर ऊर्फ हॅरीशी ‘साखरपुडा’ केला. पण या साखरपुड्यांमागे दडलं होतं एक जबरदस्त फसवणुकीचं जाळं. लाखो रुपये उकळूनही लग्नाची तारीख काही येईना आणि शेवटी एका चुकीच्या व्हॉइस मेसेजमुळे सगळं प्रकरण उघडकीस आलं. पंजाबातल्या या फसवणुकीच्या नाट्यमय घटनेनं सध्या एकच खळबळ उडाली आहे.

कॅनडात सेटल होण्याचं स्वप्न, त्यानंतर होऊ घातलेला साखरपुडा आणि शेवटी हातात काय…? केवळ फोटोला हार घालायचा आणि बँकेतून लाखो रुपये ट्रान्सफर करायचे! पंजाबमधील अशीच एक अनोखी फसवणूक करणारी घटना समोर आली आहे. एका माय-लेकीच्या जोडीनं तरुणांची स्वप्नं आणि खात्यांतील शिल्लक दोन्ही उडवलं आहे.

खन्न्यातील फैजगढ गावाचा जसदीप सिंग १० जुलै रोजी कॅनडातील हरप्रीत कौर ऊर्फ ‘हॅरी’ हिच्याशी फोटोवर साखरपुडा करण्याच्या तयारीत होता. पण याचवेळी बठिंड्याचा राजविंदर सिंग पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्याने धक्कादायक माहिती दिली. राजविंदरने सांगितलं “माझाही गेल्या वर्षी याच हरप्रीतशी साखरपुडा झाला आहे!”

या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तो एका चुकून पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे. हरप्रीतची आई सुखदर्शन कौर तिच्या मुलीला “कसे पैसे उकळायचे” याच्या सूचना देत होती आणि मेसेज चुकून तिने राजविंदर सिंगला पाठवला. पोलीस तपासात उघड झालं की, गेल्या दोन वर्षांत सात वेगवेगळ्या तरुणांशी हरप्रीतने ‘प्रॉक्सी साखरपुडा’ केला होता.

या माय-लेकीनं विवाहाच्या आमिषाने कॅनडाच्या वर्क परमिटचं स्वप्न दाखवून तरुणांशी व्हिडिओ कॉलवर बोलणं, फोटोला हार घालण्याचा सोहळा करणं आणि मग लाखो रुपये उकळणं, हा सगळा गोरखधंदा रचला होता. सुखदर्शन कौर, तिचा मुलगा मनप्रीत सिंग आणि साथीदार अशोक कुमार यांना अटक झाली आहे. सध्या हरप्रीत कॅनडात असून तिच्यावर लूक-आउट नोटीस बजावण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फसवणुकीच्या प्रकरणात सुमारे १.६० कोटी रुपयांचा गोरखधंदा झाल्याचं उघड झालं असून पंजाबभर याची जोरदार चर्चा सुरू आहे.