Youtuber Jyoti Malhotra Arrest: पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याबद्दल सहा भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हरियाणाच्या एका यूट्यूबर तरुणीचाही समावेश आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांची साखळी हरियाणा आणि पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. या साखळीत एजंट, आर्थिक सहाय्य करणारे आणि माहिती पुरविणारे लोक कार्यरत आहेत. हिसारमधील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

यूट्यूबर तरूणीचे नाव ज्योती मल्होत्रा असून तिचे यूट्यूबवर ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचे चॅनेल आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने कमिशन एजंटकडून व्हिसा मिळवून २०२३ साली पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या व्यक्तीशी तिचा संबंध आला.

भारत सरकारने दानिशला पर्सन नॉन ग्रेटा (अनावश्यक व्यक्ती) घोषित करून त्याची उच्चायुक्तालयातून १३ मे २०२५ रोजी हकालपट्टी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानेच ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी (PIOs) करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्योती पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकिर ऊर्फ राणा शाहबाजच्या संपर्कात होती. याचा फोन नंबर तिने जट रंधवा या नावाने सेव्ह केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानबद्दल सकारात्मक चित्र निर्माण करण्याचे काम पाकिस्तानी हँडलर्सकडून ज्योतीला देण्यात आले होते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत २०२३ साली पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत ज्योतीने सांगितले की, ती एका शिष्टमंडळाचा भाग होती.

Jyoti Malhotra spy case
ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी केलेले व्हिडीओ

२०२३ नंतर ज्योतीने पुन्हा एकदा पाकिस्तानला भेट दिली होती. यावेळी ती अली एहसान नामक व्यक्तीच्या संपर्कात आली. ज्याने तिची ओळख इतर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांची करून दिली. या काळात तिने संवेदनशील स्वरुपाची माहिती पाकिस्तानमधील तिच्या संपर्कातील लोकांना पाठविल्याचा आरोप केला जात आहे.

ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योतीचा लेखी जबाब घेतल्यानंतर हे प्रकरण हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.