Model Murder : एका मॉडेलचा मृतदेह हरियाणातल्या सोनिपत या ठिकाणी आढळून आला. गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह एका कालव्यापाशी फेकण्यात आला होता. या मॉडेलचं नाव शीतल असून ती हरियाणवी संगीत विश्वात कार्यरत होती. तिची हत्या कुणी केली आणि त्यामागे नेमकं काय कारण होतं? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
शीतल बेपत्ता झाल्याची तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शीतल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर तिचा शोधही घेण्यात आला. तिचा शोध सुरु असतानाच पोलिसांना आता तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हरियाणातील खांडा गावाजवळ असलेल्या एका कालव्यापाशी हा मृतदेह फेकण्यात आला होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस अधीक्षक अजित सिंह यांनी काय माहिती दिली?
सोनिपतचे पोलीस अधीक्षक अजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल चौधरी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरु होता. पोलिसांना त्या दरम्यानच एका महिलेचा मृतदेह सापडला अशी माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तो मृतदेह शीतलचा आहे याची खात्री पटली. शीतल पानिपत जिल्ह्यातील खलीला माजर गावाची आहे. शीतल चौधरीचे इन्स्टाग्रामवर १ लाख ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.
शुटिंगसाठी जाते आहे म्हणून शीतल घराबाहेर पडली होती ती परतलीच नाही
शीतल चौधरी ही मॉडेल तिच्या घरातून मी अल्बमच्या शुटिंगसाठी जाते आहे असं सांगून निघाली होती. मात्र त्यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला आहे. शीतलची हत्या करण्यात आली आहे ज्यांनी हत्या केली त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी शीतल्या कुटुंबीयांनी केली आहे. शीतलला सिम्मी चौधरी या नावानेही ओळखलं जायचं.
शीतलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला
शीतल या मॉडेलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. मागच्याच आठवड्यात १२ जूनला कमल कौर या युट्यूबरचा मृतदेह कार पार्किंग मध्ये आढळून आला होता. आदेश वैद्यकीय महाविद्यालय भटिंडा येथील पार्किंगमध्ये या युट्यूबरच्या कारमध्येच तिचा मृतदेह आढळून आला होता. तिची हत्या सत्यपाल सिंह नावाच्या एका माणसाने केली आणि तो परदेशात पळाला अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता हरियाणा येथील मॉडेलचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.