हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री परस्पर अंत्यसंस्कार करून या भयनाटय़ात भर टाकून आणखी रोष ओढवून घेतल्याचे बुधवारी समोर आले. १९ वर्षांच्या तरुणीवर १५ दिवसांपूर्वी हाथरसमधील चौघा उच्चवर्णीयांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर पोलिसांनी परस्पर या मुलीचे अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याच प्रकरणावरुन आता आम आदमी पार्टीचे आमदार अजय दत्त यांनी पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिला जर सरकारी रुग्णवाहिकेमधून नेण्यात आलं तर त्या रुग्णवाहिकेला नंबर प्लेट का नव्हती असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून पीडितेचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेला नंबर प्लेट का नव्हती. यामागील गूढ काय आहे. जर ही सरकारी रुग्णवाहिका होती तर त्यावर नंबर प्लेट का नव्हती?, असा प्रश्न दत्त यांनी विचारला आहे. यासंदर्भात आपण अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप दत्त यांनी केला आहे. दत्त हे सफदरजंग रुग्णालयामध्ये पीडितेच्या कुटुंबियांनाही भेटायला गेले होते असं न्यूज १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
पीडितेच्या कुटुबियांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा तिने नंबर प्लेट नसणारी रुग्णवाहिका असल्याचे मला दिसले. मी जेव्हा पोलिसांना यासंदर्भात विचारले असता पोलिसांनी आम्हाला मारणार करण्यास सुरुवात केली. “दोन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीबरोबर दिल्ली पोलीस असं वागले. पीडित मुलगी आमच्या समाजातील आहे. मी पीडितेच्या कुटुंबियांची मदत करण्यासाठी तिथे गेलो होतो. यासंदर्भातील तक्रार आम्ही पोलीस कमिश्नरकडे दिली आहे,” असं दत्त यांनी सांगितलं.
नक्की काय घडलं?
या चार संशयितांनी पीडितेवर अत्याचार करुन अत्यंत क्रूरपणे तिला जखमी केलं. तिच्याच ओढणीने गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जबर जखमी झालेल्या या मुलीला अलिगढमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात थोडय़ा वेळासाठी शुद्धीवर आल्यावर मुलीने संशयित आरोपींची नावे सांगितली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणले गेले, पण उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला. व्यथित झालेले तिचे वडील आणि भावाने सफदरजंग रुग्णालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले होते. पण रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून दिल्लीपासून २०० किमीवर असलेल्या त्यांच्या मूळ गावी नेले. त्यांच्यासोबत मुलीचे पार्थिवही रुग्णवाहिनीतून नेण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता किंबहुना त्यांना कोणतीही कल्पना न देता सफदरजंग रुग्णालयातून परस्पर नेल्याचा आरोप मृत मुलीच्या भावाने केला आहे.
गावात मृतदेह पोहचला तेव्हा…
पीडितेचा मृतदेह गावी आणल्याचे समजताच मोठय़ा संख्येने गावकरी जमा झाले. हिंदू परंपरेप्रमाणे पार्थिव घरी नेले जावे, नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्यविधी केला जावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. पीडितेच्या आईने तसेच, नातेवाईकांनीही पोलिसांना अडवून पार्थिव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. नातेवाईक व गावकऱ्यांनी बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याची केलेली विनंतीही पोलिसांनी मान्य केली नाही. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घरात जमलेल्या नातेवाईक गावकऱ्यांना पोलीस अंत्यसंस्कार तातडीने करण्याची गरज असल्याचे सांगत होते. पोलिसांचा दुसरा चमू अंत्यसंस्काराची तयार करत होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. हे पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या दुसऱ्या भावाने केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी ‘नाकाबंदी’ केली असल्याने प्रत्यक्ष अंत्यसंस्कार होत असताना पोलिसांव्यतिरिक्त कोणालाही तिथे जाता आले नाही. आई-वडील व अन्य नातेवाईकांच्या गैरहजेरीत पोलिसांनी अंत्यसंस्कार केले.
पोलिसांचा दावा काय?
कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या परवानगीनेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची चित्रफीत आम्ही दाखवू शकतो, असा दावा हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी केला आहे. मात्र अंत्यसंस्कार करताना आई-वडील उपस्थित होते का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रवीण कुमार यांनी टाळले. आमचा विरोध असतानाही पोलिसांनी बळजबरीने अंत्यसंस्कार करून टाकले. आमच्या मुलीचे अखेरचे दर्शनही पोलिसांनी घेऊ दिले नसल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. मात्र अंत्यसंस्कारासाठी मृत मुलीच्या कुटुंबीयांची संमती घेण्यात आली होती. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते, असा दावा पोलिसांनी केला.