उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.  या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. यावरुनच आता काँग्रेसने उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रसने ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं

“उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची क्रूर हत्या करण्यात आली असून यावरुन पोलीस व्यवस्थेचा खोटारडेपणा उघड होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिला, मुली असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या नावाखाली केवळ स्वत:चा बचाव करत आरोपींना संरक्षण देते,” असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. १० दिवस कोणालाही अटक करण्यात आली नाही, पीडितेच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊ दिले नाही, उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय पार्थिव ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले असे तीन मुद्दे मांडत भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलाय.

पोलिसांचे म्हणणे काय?

मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे. पार्थिव घरी आणला जावा यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जात आहे.  पोलिसांनी मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबाच्या परवानगीनंतरच आम्ही अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबातील सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लक्सर यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करत सर्व बातम्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कुटुंबिय सहभागी झाले होते असं जिल्हाधिकारी म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hathras gangrape yogi government failed to protect india daughter congress slams uttar pradesh police and government scsg
First published on: 30-09-2020 at 12:45 IST