‘कोव्हॅक्स’ कार्यक्रमाअंतर्गत ऑक्टोबरपासून निर्यात

जगाला पुन्हा करोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा सुरू करण्याच्या आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेने स्वागत केले असून भारताचे आभार मानले आहेत. कोव्हॅक्स कार्यक्रमाअंतर्गत भारताने ऑक्टोबरपासून पुन्हा लस निर्यात सुरू करण्याचे ठरवले आहे.

सर्व देशांना जागतिक पातळीवर लशीचा पुरवठा समान पातळीवर व्हावा यासाठी कोव्हॅक्स योजना हाती घेण्यात आली होती. या कार्यक्रमाअंतर्गत लस पुरवठा पुन्हा सुरू करण्याचे भारताने ठरवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रेसस यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे, की आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ऑक्टोबरपासून कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी लस निर्यात सुरू करण्याचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. वर्षअखेरीस सर्व देशांमध्ये चाळीस टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उचललेले हे पाऊल लस समानतेसाठी महत्त्वाचे आहे.

मंडाविया यांनी सोमवारी असे जाहीर केले की, २०२१ च्या चौथ्या तिमाहीत आम्ही जास्तीच्या करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा जगासाठी पुन्हा सुरू करणार आहोत.

लसमैत्री कार्यक्रमाअंतर्गत कोव्हॅक्स या जागतिक उपक्रमाअंतर्गत हा पुरवठा केला जाणार आहे. आमच्या नागरिकांना लस दिल्यानंतर उरलेल्या लस मात्रा या निर्यात केल्या जातील. लस उत्पादनाबाबत त्यांनी असे म्हटले होते, की ऑक्टोबरमध्ये करोना प्रतिबंधक लशीच्या ३० कोटी मात्रा उपलब्ध होतील. ऑक्टोबर-डिसेंबर या काळात १०० कोटी लस मात्रा उपलब्ध होतील. आतापर्यंत भारतात ८२.६५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.