पीटीआय, प्रयागराज
ज्ञानवापी मशीद संकुलाच्या तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी देणाऱ्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. मात्र, ही सुनावणी पूर्ण झाली नसून ती बुधवारीही सुरू राहील असे न्या. रंजन अग्रवाल यांनी सांगितले.
मंगळवारी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या. मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने शुक्रवारी उच्च न्यायालयात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. मात्र, त्यावर तातडीने कोणताही आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला होता. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पूर्ण न झाल्याने आता ती बुधवारी सकाळी १० वाजता पुढे सुरू होईल असे न्यायाधीशांनी सांगितले.
हेही वाचा >>>मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल
मशीद समितीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील एस एफ ए नक्वी यांनी न्यायालयाला सांगितले की, जिल्हा न्यायालयाच्या मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देणाऱ्या ३१ जानेवारीच्या आदेशाने सुरुवातीलाच अंतिम निर्णय देऊन टाकला आहे, ज्याला परवानगी देता येणार नाही. हा निकाल अतिशय घाईने, म्हणजे संबंधित न्यायाधीशांच्या निवृत्तीच्या दिवशी देण्यात आला होता असा आक्षेपही नक्वी यांनी नोंदवला.