श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद
काश्मीरच्या कुपवाडा, पहलगाम आणि गुलमर्ग येथे काल रात्रीपासून बर्फवृष्टी होत असून सपाट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला आहे. पुढील तीन दिवसांत आणखी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कुपवाडा, पहलगाम आणि गुलमर्ग येथे काल रात्रीपासून बर्फवृष्टी होत असून अखेरचे वृत्त हाती आले तेव्हाही बर्फवृष्टी सुरू होती, असे सांगण्यात आले. गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की-रिसॉर्ट येथे सकाळी आठ वाजेपर्यंत आठ इंच बर्फवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली.
पहलगाम येथील डोंगराळ प्रदेशातील रिसॉर्टवर हलक्या स्वरूपाची बर्फवृष्टी झाली तर कुपवाडा शहरांत ३४.५ मि.मी. बर्फवृष्टी आणि पावसाची नोंद करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्मीर खोऱ्यातील उंच प्रदेशांत मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
श्रीनगर आणि अन्य सपाट प्रदेशाला रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असल्याचे वृत्त आहे. शहरांत ६.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आणि त्यामुळे अनेक परिसरात पाणी साचले होते.
काश्मीरच्या दक्षिणेकडील काझिंगद शहरांत ३.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर जोरदार पाऊस कोसळल्याने हा मार्ग बंद करावा लागला, सकाळी महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र पावसामुळे पुन्हा दुपारी मार्ग बंद करणे भाग पडले.