लेहमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरु झाला आहे. लेह आणि कारगील या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र रात्री ९ नंतर लेहमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने लेहमध्ये हजेरी लावली. कारगील DIPR ने ट्वीट करत लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस आला आहे. वातावरण ढगाळ राहिल तसंच यामुळे भूस्खलन होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. लेहमध्ये रस्त्यांमध्ये अडसर येऊ शकतात. लोकांनी शांत आणि सतर्क रहावं आवाहन करण्यात आलं आहे.

खरदोंग आणि खालसार या गावातला रस्ता पावसामुळे बंद झाला होता. तो आता सुरु करण्यात आला आहे. तसंच पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झालं आहे. लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनीही ट्विट करुन सांगितलं आहे.

लेह या ठिकाणी खानावळ हे मराठमोळं हॉटेल चालवणारे प्रशांत ननावरे यांनीही या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसंच लेहमध्ये ढगफुटी झाल्याचं म्हटलं आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. काहीतरी फुटल्याचा आवाज़ आला. त्यानंतर पाऊस थांबला. लेहच्या रस्त्यांवर पाणी आणि चिखल आहे. उतारावरील हॉटेल आणि घरांमध्ये पाणी-चिखल शिरला आहे असंही प्रशांत ननावरेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान लोकांनी घाबरुन जाऊ नये आणि सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. लेहमधला पाऊस सध्या थांबला आहे. मात्र यामुळे रस्ते आणि इतर सार्वजनिक मालमत्ता यांचं नुकसान होतं आहे. मागच्या आठवड्यातही अशीच एक घटना घडली होती असं आत्माराम परब यांनी लोकसत्ता ऑनलाइनला सांगितलं आहे.