Ahmedabad Plane Crash : अहमदाबादहून लंडनला निघालेलं विमान १२ जून रोजी टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळलं. या घटनेत विमानत बसलेल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना इतकी भयंकर होती की त्यात एक प्रवासीही नशिबाने वाचला. बाकी सर्व प्रवासी ठार झाले. याच विमानात बसली होती पायल खाटिक. तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्नं होती उच्च शिक्षणाला जाण्याची. पायलचे वडील रिक्षाचालक आहेत त्यांनी कर्ज काढून मुलीला लंडनला पाठवलं होतं. मात्र ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच भंगलं. कारण पायलचा या अपघातात मृत्यू झाला. पायल उच्च शिक्षणासाठी लंडनला चालली होती.
पायल ही २२ वर्षांची तरुणी तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून लंडनला जात होती
पायल ही २२ वर्षांची तरुणी होती, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात होती. पायलला लंडनला जाऊन एम टेक करायचं होतं. तिचे वडील रिक्षा चालक आहेत. त्यांनी मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून कर्ज काढलं होतं. तिला लंडनला पाठवण्याची तयारी त्यांनी केली आपली मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करेल अशी आशा त्यांना होती.
पायलच्या नातेवाईकांनी काय सांगितलं?
पायलच्या एका नातेवाईकाने सांगितलं, “पायलच्या वडिलांचं स्वप्न होतं की मुलगी शिकून मोठी व्हावी. तिने कधीही विमान प्रवास केला नव्हता. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. त्यांनी तिला लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. सगळ्या कुटुंबाला तिच्याकडून अपेक्षा होत्या, मुलगी शिकेल चांगले पैसे कमवेल आणि आपली परिस्थिती सुधारेल असं त्यांना वाटत होतं. पण ती या जगात राहिली नाही. त्या विमान अपघाताने सगळं काही हिरावून नेलं.”
संकेत गोस्वामी या विद्यार्थ्याचाही मृत्यू
विमानात पायल प्रमाणेच संकेत गोस्वामी हा गुजरातमधला तरुण मुलगाही होता. तो मेहसाणाचा होता. तो लंडनला उच्च शिक्षणासाठी जात होता. त्याच्या काकांनी सांगितलं, माझ्या भावाचा मुलगा हरपला. त्याला एक लहान बहीण आहे. आता संकेत या जगात नाही. विमान अपघाताने त्याला आमच्यापासून हिरावून नेलं.