नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा व राजस्थान या राज्यांतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारी मालकीच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) २७३१.३२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती बुधवारी संसदेत देण्यात आली.

या आंदोलनामुळे ऑक्टोबर २०२० पासून टोलनाक्यांवरील वसुलीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

आंदोलक शेतकऱ्यांनी सुरुवातीला ऑक्टोबर २०२० मध्ये पंजाबमधील टोलनाके बंद पाडले. हे लोण नंतर लगतच्या संपूर्ण हरियाणा व राजस्थानच्या काही भागांपर्यंत पोहोचले. शेतकरी आंदोलनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील ६० ते ६५ टोलनाके प्रभावित झाले व परिणामी २७३१ कोटी रुपयांच्या टोलवसुलीचे नुकसान झाले, असे गडकरी म्हणाले.

विविध आंदोलनांमुळे रेल्वेचे नुकसान

नवी दिल्ली : शेतकरी व इतर सघटनांच्या आंदोलनामुळे चालू वर्षांत रेल्वेला ३६.८७ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत दिली. यापैकी उत्तर रेल्वेचे सर्वाधिक, म्हणजे २२.५८ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे लोकसभेत एका पश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

‘पोलीस’ व ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हे राज्यांचे विषय असून; शासकीय रेल्वे पोलीस/ जिल्हा पोलीस यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमार्फत रेल्वे परिसरातील गुन्ह्य़ांना प्रतिबंध, छडा लावणे व तपास, तसेच या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर आहे, असे वैष्णव म्हणाले.