हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करून भाजपा उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सर्व सहा आमदारांवर कारवाई केली आहे. या सर्व आमदारांना अपात्र ठरवलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरविरोधी कायद्यान्यवये ही कारवाई केली आहे. पठानिया म्हणाले, मंत्री हर्षवर्धन यांनी पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत सहा आमदारांविरुद्ध तक्रार केली होती. हर्षवर्धन आणि सर्व सहा आमदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आम्ही या सहा आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा अध्यक्ष म्हणाले, या आमदारांनी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. परंतु, आता त्यांनी त्याच काँग्रेसच्या व्हिपचं उल्लंघन केलं आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला मत दिलं नाही. मी दोन्ही बाजूचे दावे-प्रतिदावे ऐकून घेतले आणि तीस पानांचं निवेदन जारी केलं आहे. याअंतर्गत आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंदर भुट्टो, इंदर दत्त लखनपाल या सहा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदशमधील राज्यसभेच्या जागेवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान झालं. यावेळी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता. परंतु, तरीही भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. परिणामी हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या बाजूला मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी काँग्रेसवरच आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

मंगळवारी देशात राज्यसभेच्या ४१ जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये एका जागेसाठी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. काँग्रेस सत्ताधारी असल्याने त्यांच्याकडे बहुमत होते. त्याचबरोबर त्यांना अपक्षांचाही पाठिंबा होता. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल अशी चिन्हं दिसत होती. परंतु, याठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे येथे क्रॉस वोटिंग झाल्याचं उघड झालं. भाजपामधून हर्ष महानज आणि काँग्रेसमधून अभिषेक मनु सिंघवी असे उमेदवार उभे होते. परंतु, येथे भाजपाने बाजी मारल्याने आता भाजपाने काँग्रेसवर टीका केली.

(बातमी अपडेट होत आहे.)