अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन केले जाणार आहे. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष आतापासूनच साजरा केला जात आहे. नुकतेच अमेरिकेमधील वॉशिंग्टन डीसी येथील मेरीलँडच्या श्री भक्त आंजनेय मंदिराजवळ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने चारचाकी आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक हिंदू भाविक या रॅलीत सहभागी झालेले पाहायला मिळाले.
मंदिराजवळ असलेल्या ‘अयोध्या मार्ग’ (Ayodhya Way) या रस्त्यावरून वाहन आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अमेरिकन हिंदू समाजातील अनेक लोक रॅलीसाठी जमले होते. लहानथोरांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांचा यात सरभाग होता. अमेरिकेच्या इतर राज्यातूनही काही हिंदू भाविक या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात येते.
विश्व हिंदू परिषदेच्या वॉशिंग्टन डीसीचे अध्यक्ष महेंद्र सापा हे या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक आहते. त्यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल. त्याआधी आम्ही वॉशिंग्टन येथे राम मंदिर उदघाटनाचा सोहळा साजरा केला. “अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्री राम मंदिराचे उदघाटन अयोध्येत होत आहे. त्यासाठी २० जानेवारी २०२४ रोजी आम्ही वॉशिंग्टन डीसी येथे ऐतिहासिक अशा सोहळ्याचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये १००० हिंदू कुटुंब सहभागी होतील, अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी रामलीला, राम कथा, श्री राम आरती आणि भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
हे वाचा >> अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाची मागणी
या सोहळ्याचे सहआयोजक अनिमेश शुक्ला यांनी सांगितले की, २० जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यात लहान मुलांकडून ४५ मिनिटांचे श्री राम यांच्या जीवनावर आधारित एक छोटे नाटक सादर केले जाणार आहे. अमेरिकन मुलांना समजेल, उमजेल अशा भाषेत हे नाटक तयार केले आहे.
या रॅलीमध्ये भारतातील इतर भाषिक भाविकही सहभागी झाले होते. त्यामध्ये तमिळ, कन्नड, तेलुगू भाविकांचा विशेष सहभाग होता. श्री रामाचे त्यांच्या जीवनात काय महत्त्व आहे, याबद्दल भावना त्यांनी व्यक्त केल्या. अंकुर मिश्रा हे स्थानिक हिंदू नेते असून त्यांचा जन्म अमेरिकेतच झालेला आहे. आम्ही अमेरिकन नागरिक झालो असलो तरी आमच्या अनेक पिढ्यांनी अयोध्येत राम मंदिर व्हावे, असे स्वप्न पाहिले असल्याचे सांगितले.
आणखी वाचा >> श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा : विश्व हिंदू परिषदेतर्फे घरोघरी ‘भाव जागरण’
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार असल्याचे श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने जाहीर केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिराच्या गर्भगृहाचा फोटो जाहीर करण्यात आला होता. ट्रस्टने देशभरातून ८००० लोकांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठविले आहे. जवळपास ३००० व्हिआयपी लोक यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.