जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून सत्कार केला जाणार आहे. “हा तरुण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्रभक्त आहे,” असंही हिंदू महासभेने म्हटलं आहे. “शरजील इमाम आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, शाहीन बागमधील देशद्रोही लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत,” असं धक्कादायक वक्तव्य हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊ या वेबसाईटने दिलं आहे.

“या मुलाचा आम्हाला अभिमान आहे. त्याने जामियाच्या कॅम्पसमधील देशद्रोही कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारी आझादी देण्याचा प्रयत्न केला,” असं मत हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी व्यक्त केलं आहे. देशद्रोही विचारसरणीच्या व्यक्तींना धडा शिकवण्याचा प्रयत्न या तरुणाने केला आहे असंही पांडे म्हणाले. इतकंच नाही तर “खून आणि देशाच्या भल्यासाठी केलेल्या कृत्यामध्ये फरक असतो. देशहितासाठी केलेल्या कृत्याला कायदा वेगळा असतो,” मतही पांडे यांनी मांडले.

जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्याबरोबरच त्याला या प्रकरणात लागणाला सर्व कायदेशीर खर्च हिंदू महासभा करणार असल्याचेही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की काय घडलं जामियामध्ये?

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्याचे ठरवले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले. ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेला शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. जामिया येथेही आंदोलन कायम असून मोर्चा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी हजारो विद्यार्थी जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलकांमध्ये उभ्या असलेल्या एका तरुणाने खिशामधून बंदूक काढली आणि आंदोलकांवर गोळीबार केला. पोलीसच नव्हे तर शीघ्र कृती दलाचा ताफाही तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. जवळपास सात तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दिल्ली निवडणुकीची पार्श्वभूमी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी उरला असताना भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विरोधातील शाहीन बागमधील आंदोलनाभोवती प्रचार केंद्रित केला आहे. या आंदोलनाविरोधात भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रक्षोभक विधान केल्यानंतर दोन दिवसांनी जामिया परिसरात युवकाने गोळीबार केला. त्यामुळे दिल्ली निवडणूक प्रचार अधिक गंभीर बनला आहे.