जयपूर : दक्षिण भारतातील हिंदू संतांनी मिशनरींपेक्षा जास्त सेवाकार्य केले आहे, पण त्याविषयी फार बोलले जात नाही अशी खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केली. मात्र, सेवा ही सेवा असते, सेवेची गणना करता येत नाही, त्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरासाठी उद्योजक अजय पिरामल हेही उपस्थित होते.
या चिंतन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भागवत म्हणाले की, समाजातील सेवेबद्दल बोलताना देशातील बुद्धिवंत सामान्यत: मिशनऱ्यांचा उल्लेख करतात. ते जगभरात विविध संस्था, शाळा आणि रुग्णालये चालवतात. हे सर्वाना माहीत आहे. पण हिंदू साधूसंत काय करतात याचा विचार करून चेन्नईमध्ये हिंदू सेवा मेळावा आयोजित करण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. कन्नडभाषक, तेलुगूभाषक, मल्याळमभाषक आणि तमिळभाषक आचार्य, मुनी आणि संन्यासी यांनी केलेली समाजसेवा ही मिशनऱ्यांनी केलेल्या सेवेपेक्षा कितीतरी पट अधिक असते असे त्या वेळी लक्षात आले असा दावा भागवत यांनी केला.
समाजामधील मागासलेपणा दूर करण्याची गरज आहे, सर्व जण समान आहेत. आपण सर्व जण समाजाचे भाग आहोत, जर आपण एकत्र नसू तर आपण अपूर्ण राहू असे भागवत म्हणाले. दुर्दैवाने समाजामध्ये असमानता आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महंत बालयोगी यांच्याकडून अल्पसंख्याक लक्ष्य भागवत यांच्याआधी उज्जैनमधील वाल्मीकी धामचे महंत बालयोगी उमेश दास नाथ यांनी भाषण केले. त्यांनी नाव न घेता अल्पसंख्याकांना लक्ष्य केले.