इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान यावर्षी हिंदूजा बंधूंनी मिळवला आहे. हिंदुजा बंधूंसह लॉर्ड स्वराज पॉल आणि भारतीय वंशाच्या इतर चौघांनीही अब्जाधीशांच्या यादीत वरचे स्थान पटकावले आहे. यामध्ये पोलादसम्राट लक्ष्मी मित्तल यांचाही समावेश आहे.
लंडनस्थित श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा यांची एकूण मालमत्ता ११.९ अब्ज पौंड इतकी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १.३ अब्ज पौंडाने वाढली आहे. हिंदुजा बंधूंनी पोलादसम्राट लक्ष्मी मित्तल आणि रशियन उद्योगपती अलिशर उस्मानोव्ह यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मागे टाकल्याची माहिती संडे टाइम्सने रविवारी प्रसिद्ध केली.
बांधकाम, तेल, बँकिंग आदी उद्योगांमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या हिंदुजा बंधूंनी तिसऱ्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांच्यापाठोपाठ गतवर्षी प्रथम क्रमांकावर असणाऱ्या आर्सेनरचे भागधारक आणि रशियन उद्योगपती उस्मानोव्ह हे दुसऱ्या क्रमांकावर घसरले. त्यांची एकूण मालमत्ता १०.६५ अब्ज पौंड इतकी आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पोलादसम्राट लक्ष्मी मित्तल यांची मालमत्ता १०.२५ अब्ज पौंड इतकी आहे.
संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधू, लक्ष्मी मित्तल या भारतीयांसह प्रकाश लोहिया, लॉर्ड स्वराज पॉल, अनिल अग्रवाल, अजय कालसी आदी भारतीय उद्योगपतींचा समावेश आहे.
गेल्या वर्षी हिंदुजा बंधूंनी सौदी अरेबियातील पेट्रोमिन कंपनीला विकलेले समभाग, भारतात मालमत्तेतील गुंतवणूक, इंडसइंड बँकेतील भांडवल आदींमुळे त्यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे. लक्ष्मी मित्तल यांना गेल्या काही वर्षांत थोडीफार घट सोसावी लागल्यानंतर यंदा पुन्हा त्यांनीही उसळी मारल्याचे संडे टाइम्सने म्हटले आहे.
याशिवाय कापड आणि प्लास्टिक उद्योगात भरीव कामगिरी करणाऱ्या मित्तल यांचे नातेवाईक लोहिया यांनी २.११ अब्ज पौंडासह ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत ४२वे स्थान मिळवले आहे. अनिवासी उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांनी २ अब्ज पौंडासह ४८वे स्थान पटकावले आहे.
इतर अब्जाधीशांमध्ये चेल्सा फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रामोव्हिच (८.५२ अब्ज पौंड), क्रीडा उद्योगाशी निगडित माइक अ‍ॅशले (३.७५ अब्ज पौंड) आणि व्हर्जिन समूहाचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सन (३.६ अब्ज पौंड) आदींचाही समावेश आहे. ब्रिटनधील १०३ अब्जाधीशांकडे ३०१ अब्ज पौंडापेक्षाही अधिक संपत्ती एकवटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinduja family is the most rich in britain
First published on: 12-05-2014 at 01:13 IST