टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्ताने कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित कार्यक्रमावर विरोधाचे सावट निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला हिंदूत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला असून हा समारंभ उधळण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

टिपू सुलतान हे हिंदू विरोधी होते, त्यामुळे त्यांचा गौरव राज्य सरकारने करू नये असे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे म्हणणे आहे. टिपू सुलतान यांच्या भूमिकेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अनेकदा वाद देखील निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमचा विरोध असल्याचे माहित असूनही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विविध कार्यक्रमांतून टिपू सुलतानच्या प्रतिमा संवर्धनाचे काम सुरूच आहे. आता आमची सहनशीलतेचा अंत झाला असून सरकारने आयोजित केलेला टिपू सुलतान यांच्या जयंतीचा आर्यक्रम आम्ही उधळून लावू, असे बजरंग दलाचे राज्य संयोजक सुर्यनारायण यांनी सांगितले आहे.

विश्व हिंदू परीषदेच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करत राज्याचे माहिती मंत्री रोशन बेग यांनी टिपूची २६६वी जयंती राज्य सरकार साजरी करणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त टेलीग्राफने दिले आहे. अत्यंत कडेकोड सुरक्षा असलेल्या राज्य सरकारच्या इमारतीमध्ये हा समारंभ होणार असल्यामुळे कार्यक्रम उधळण्याच्या धमक्यांचा काही परिणाम होणार नसल्याचे बेग म्हणाले आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या करणार असून साहित्यिक गिरीष कर्नाड, बारगूर रामचंद्रप्पा आणि इतिहासकार शेख अली, तालकड चिकरांगे गोवडा व एन. व्ही. नरसिंह उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.