संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. या अधिवेशनात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जातील असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे. ७५ वर्षांचा देशाचा प्रवास हा नव्या टप्प्यात येऊन पोहचला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच जास्तीत जास्त सदस्यांनी या अधिवेशनाला उपस्थित रहावं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २०४७ मध्ये आपला देश विकसित देश असला पाहिजे या दिशेने हे पहिलं पाऊल आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.

चांद्रयान ३ यशस्वी झालं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला तिरंगा फडकतो आहे ही गौरवाची बाब आहे असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. संपूर्ण जगात आज आपल्या देशाचं नाव घेतलं जातं आहे. आधुनिकता आणि तंत्रज्ञान याच्याशी आपला देश जोडला जातो आहे. आपलं सामर्थ्य आता जगाला कळलं आहे त्यामुळे अनेक संधी आपल्या दरवाजाशी येऊन उभ्या आहेत. जी २० परिषदेचं आपल्याला खूप चांगलं यश मिळालं. भारताची विविधता आणि एकता यांचं दर्शन या परिषदेत झालं. आपण ग्लोबल साऊथचा आवाज झालो आहोत. भारताच्या उज्ज्वल भविष्याचे हे संकेत आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण संसदेत विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत.

मागच्या ७५ वर्षात जो प्रवास देशाने केला तो प्रेरक आहे. आता आपल्याला नवे संकल्प सोडायचे आहेत. आपण नव्या संसदेत अधिवेशन घेत आहोत. हे अधिवेशन छोट्या कालावधीसाठी असलं तरीही देशासाठी महत्त्वाचं. देशात अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. रडगाणी गाण्यासाठी बराच काळ आहे तो नंतर करा, आपल्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसद भवनात या असं आवाहन मी प्रत्येक संसद सदस्याला करतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या गणेश चतुर्थी आहे. गणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं. भारताच्या विकासात आता कुठलंही विघ्न येणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच हे अधिवेशन कमी कालावधीसाठी असलं तरीही महत्त्वाचं आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.