मथुरा, कोलकाता : देशभरत होळी उत्साहाने साजरी करण्यात आली. मथुरा शहर इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये न्हाऊन निघाले होते. ब्रजभूमीत, विशेषत: वृंदावन आणि गोवर्धन येथे जणू रंगांचा प्रस्फोट झाला होता.  ‘हजारो भाविक परिक्रमा करत एकमेकांवर गुलाल फेकत असल्याने गोवर्धन परिक्रमेचा मार्ग अक्षरश: इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये भिजलेला आहे’, असे गोवर्धनमधील दांघाटी मंदिराचे पुजारी पवन कौशिक यांनी सांगितले.

काशीच्या पुरातन शहरात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. हौशी लोक अबीर- गुलाल उधळत रस्त्यांवरून नाचत-गात जात होते. शहरातील घाटांवर उसळलेल्या गर्दीत विदेशी पर्यटकही उत्साहाने सहभागी झाले होते. रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी भगवान महादेवाने अंगाला चितेची राख फासून नृत्य केले होते. तेव्हापासून, चितेच्या राखेसह होळी खेळण्याची परंपरा सुरू झाली, असे बटुक भैरवचे महंत जितेंद्र मोहन पुरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> महाकाल मंदिरातील आगीत १४ जखमी

अयोध्येतील श्रीराम मंदिरात होळीचा सण भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. निरनिराळया ठिकाणांवरून लोक पहाटेच मंदिरात पोहोचले आणि त्यांनी मंदिरातील मूर्तीना रंग व गुलाल अर्पण केला. यानंतर श्रीराम जन्मभूमीचा संपूर्ण परिसर रंगांच्या उत्सवाच्या आनंदात बुडून गेला.

राममंदिराच्या आवारात पुजाऱ्यांनी मूर्तीवर फुले उधळली. राग भोग व अलंकार यांचा भाग म्हणून मूर्तीला अबीर- गुलाल अर्पण करून ते होळी खेळले. या वेळी मूर्तीला छप्पन भोगही अर्पण करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये ‘डोल यात्रा’ साजरी पश्चिम बंगालमध्ये ‘डोल यात्रा’ म्हणून ओळखला जाणारा होळीचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. राज्यभर निरनिराळया ठिकाणी सकाळी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. राधाकृष्णाच्या प्रतिमा हाती घेतलेल्या भाविकांनी गाणी गात लोकांवर गुलाल उधळला आणि फुलांचा वर्षांव केला.