Honeymoon Couple इंदूरहून मधुचंद्रासाठी शिलाँगला गेलेलं जोडपं बेपत्ता झालं होतं, या जोडप्याचा शोधही सुरु होता. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे २३ मे पासून बेपत्ता झाले होते. त्यातल्या राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. त्याची पत्नी सोनम अद्यापही बेपत्ता आहे. तिचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे अशी माहिती इंदूर पोलिसांनी दिली.
राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला
राजा रघुवंशी आणि सोनम हे दोघंही मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले होते. त्यातील राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी झालं. ११ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरुवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले आणि त्यांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं. २३ मे रोजी ते शिलाँगला रवाना झाले. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवत होतं. आता राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला आहे.
शिलाँग पोलिसांनी काय माहिती दिली?
शिलाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी या जोडप्याने घेतलेली स्कुटी बेवारस अवस्थेत आढळून आली होती त्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला आहे. आता पोलिसांची पथकं सोनम रघुवंशीचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेश त्रिपाठी यांनी सांगितलं की जो मृतदेह सापडला आहे त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येते आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केला शोक
राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम मधुचंद्रासाठी गेले होते. त्यातल्या राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मेघालय या ठिकाणी मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशी यांचा मृतदेह मिळाल्याची घटना क्लेशदायक आहे. त्यांची पत्नी सोनम यांचा शोध सुरु आहे. या कठीण काळात माझ्या सहवेदना रघुवंशी कुटुंबासह आहेत ओम शांती अशा आशयाची पोस्ट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे.
११ दिवसांनी सापडला राजा रघुवंशीचा मृतदेह
२३ मे रोजी राजा आणि सोनम यांचं लोकेशन शिलाँग येथे दाखवत होतं. या दोघांशी काहीही संपर्क होऊ न शकल्याने राजा आणि सोनम या दोघांचेही भाऊ शिलाँगला रवाना झाले होते आणि त्यांचा शोध घेत होते. हे दोघेही बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर ११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे रघुवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.