Honeymoon Murder : मध्य प्रदेशातील इंदूर येथील या ठिकाणी व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनमने तिचा प्रियकर आणि इतर सुपारी किलर्सच्या मदतीने घडवून आणली. मे महिन्यात हे दोघंही जण लग्नानंतर मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले होते. त्यानंतर सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासह संगनमत करुन राजा रघुवंशीची हत्या घडवून आणली. या सगळ्यांना पोलिसांनी जून महिन्यात अटक केली. आता या प्रकरणी एक हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
राजा रघुवंशीची हत्या पूर्वनियोजित कट
राजा रघुवंशीची हत्या हा पूर्वनियोजित कट होता. दाओ नावाच्या धारदार सुऱ्याने राजावर वार करण्यात आले. राजा जिवाच्या आकांताने ओरडत होता, किंचाळत होता. पण सोनम तोंड फिरवून उभी राहिली. राजावर राज कुशवाहा आणि सुपारी किलर्सनी वार केले. त्यानंतर तो दाओ कुठल्याही कापडाने किंवा कागदाने नाही तर जंगली गवताने स्वच्छ करण्यात आला. सोनमने गवताच्या मदतीने त्या हत्यारावरचे रक्ताचे डाग पुसले होते. त्याच्यावर कुणाच्याही हाताचे डाग राहायला नकोत याची खबरदारी घेण्यात आली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी राज कुशवाहा आणि सोनमची जी चौकशी केली त्यात हे समोर आलं आहे की दोघांनी इंदूरमध्येच राजाची हत्या करण्याचा कट आखला होता.
सोनमचा कावा कसा उघडकीस आला?
सोनमने या सगळ्या प्रकरणात तिचाही मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. त्यामुळेच मधुचंद्राला शिलाँगला जाऊन तिथून गायब झाल्याचा कटही सोनमने आखला होता. मात्र राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर सोनमचा कावा उघडकीस आला. २३ मे २०२५ ला राजा रघुवंशीची हत्या राज कुशवाहा, विशाल उर्फ विक्की, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या चौघांनी मिळून केली. आधी आसाममध्ये राजा रघुवंशीची हत्या करण्यात येणार होती. मात्र नंतर मेघालयच्या सोहरामध्ये ही हत्या करण्यात आली आणि राजाचा मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला होता. आज तक ने हे वृत्त दिलं आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येचं प्रकरण नेमकं काय आहे?
सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची तीन सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या घडवून आणली. या प्रकरणात फरार असलेली सोनम रघुवंशी ८ जूनच्या रात्री उशिरा पोलिसांना शरण आली. मे महिन्यात हे हत्याकांड घडलं होतं. या प्रकरणामुळे सगळा देश हादरून गेला होता. इंदूर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी सोनम रघुवंशी यांचा विवाह ११ मे रोजी झाला. त्यानंतर २० मे रोजी हे दाम्पत्य मधुचंद्रासाठी सुरुवातीला बंगळुरुला आणि त्यानंतर गुवाहाटी येथे असलेल्या कामाख्या मंदिरात गेलं. गुवाहाटीहून हे दोघंही २३ मे रोजी शिलाँगमधील इस्ट खासी हिल्स या ठिकाणी गेले होते. मात्र त्या ठिकाणाहून दोघंही बेपत्ता झाले होते. त्यानंतर २४ मे पासून या दोघांचा शोध सुरु झाला होता. २ जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना आढळला आणि सोनम रघुवंशी बेपत्ता होती हे समजलं. जी अखेर ८ जूनला शरण आली होती तेव्हापासून ती अटकेत आहे.
राजाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना काय काय सापडलं?
राजा रघुवंशीचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्याच्या हातावरील राजा या टॅटूवरुन त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. Pentra 40 या गोळ्यांचं पाकीट, एका महिलेचा पांढरा शर्ट, मोबाइलच्या एलईडी स्क्रीनचा एक भाग सापडला. तसंच राजा रघुवंशीच्या मृतदेहाच्या डाव्या मनगटावर एक स्मार्ट वॉच सापडलं. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात सोनमचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा विशिष्ट क्रमांकांवर सोनम सातत्याने फोनवर बोलत होती हे पोलिसांना समजलं. त्यानंतर या प्रकरणात राज कुशवाहाला पोलिसांनी अटक केली. राज कुशवाहाच्या अटकेनंतर ८ जूनच्या रात्री सोनम पोलिसांना शरण आली.
