राजस्थानमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या आईवडीलांनी जावयाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून मुलीचे आईवडील आणि  त्यांच्यासोबतच्या गुंडाचा शोध सुरु आहे.

केरळमधील अमित नायर (वय २८) या इंजिनिअर तरुणाने दोन वर्षांपूर्वी जयपूरमधील ममता चौधरी या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. या लग्नामुळे ममता चौधरीचे आईवडील नाराज होते. ममताने अमितला सोडून घरी परतावे यासाठी त्यांनी तगादा लावला होता. बुधवारी सकाळी जयपूरमधील कर्नी विहारमधील अमित नायरच्या घरात ममताचे आईवडील पोहोचले. त्यांनी ममताकडे घरी परतण्यासाठी पुन्हा तगादा लावला. ममताने वारंवार नकार दिल्यावर तिच्या आईवडीलांसोबत आलेल्या तरुणाने अमितवर तीन गोळ्या झाडल्या आणि तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमितला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

अमितची आई रमादेवी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. ‘ममताचे वडील रामजीवन आणि आई भगवनी देवी हे दोघे घरात आले तेव्हा अमित झोपला होता. मी आणि माझी सून ममताने त्यांना घरात घेतले. काही वेळाने अमितही बाहेर आला. यानंतर अमित आणि ममताच्या आईवडीलांमध्ये भांडण झाले. या भांडणानंतर ममताच्या आईवडीलांनी घराबाहेर थांबलेल्या एका तरुणाला आत बोलावले. त्याने अमितवर तीन गोळ्या झाडल्याचे रमादेवी यांनी फिर्यादीत म्हटले आहेत. ममताचे वडील रामजीवन, आई भगवनी देवी आणि त्यांनी आणलेल्या शूटरचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ऑनर किलिंगमधून ही हत्या झाल्याने जयपूरमध्ये खळबळ माजली आहे.