JD Vance on Wife Usha: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी चर्चा होत आहे. मिसिसिपी येथील टर्निंग पॉईंट यूएसए या कार्यक्रमात बोलत असताना त्यांना भारतीय वंशाच्या एका तरूणीने इमिग्रेशन, हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबतचा अट्टाहास याबद्दल प्रश्न विचारले. यानंतर जेडी व्हान्स यांनी त्यांची पत्नी उषा व्हान्स यांच्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला. माझी पत्नी एकदिवस ख्रिश्चन धर्म स्वीकारेल, अशी आशा व्हान्स यांनी व्यक्त केली.
जेडी व्हान्स म्हणाले, माझी पत्नी ख्रिश्चन कुटुंबात वाढलेली नाही. ती हिंदू कुटुंबात वाढली. आम्ही जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा मी स्वतःला नास्तिक मानत होतो आणि मला वाटते तीही स्वतःला तसेच समजत होती.
टर्निंग पॉईंट यूएसए या कार्यक्रमात भारतीय वंशाच्या तरूणीने विचारले की, तुमची पत्नी ख्रिश्चन धर्म स्वीकारेल का? यावर व्हान्स म्हणाले, “बहुतेक रविवारी पत्नी उषा माझ्याबरोबर चर्चमध्ये येते. मी आज इथे जाहिररित्या सर्वांसमोर सांगू इच्छितो की, ज्या गोष्टीमुळे मला चर्चमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. तशीच प्रेरणा उषालाही मिळावी, अशी माझी इच्छा आहे. माझा ख्रिस्ती गॉस्पेलवर विश्वास आहे आणि माझ्या पत्नीलाही ते लवकरच पटेल.”
२०१९ साली उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी कॅथोलिक धर्म स्वीकारला. ते म्हणाले, उषा आणि माझे लग्न मोकळा संवाद आणि आमच्या श्रद्धांबाबत आमचा एकमेकांवरील आदरावर बांधले गेलेले आहे. माझी पत्नी माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आम्ही या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलतो. आमच्या मुलांना आम्ही ख्रिश्चन धर्मात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
उषा व्हान्स यांचा धर्मांतराला विरोध
उषा व्हान्स या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत ज्या उपराष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणून ओळखल्या जात आहेत. अमेरिकेत त्यांना सेकंड लेडी म्हणतात. उषा यांनी मागेच धर्मांतर करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, त्यांची तीन मुले आहेत. इवान, विवेक आणि मिराबेल या तिघांनाही त्यांनी स्वतःहून धार्मिक पर्याय देण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
उषा या हिंदू कुटुंबात वाढल्या आहेत. त्यांचे आई-वडील आणि आजी हिंदू धर्मातील होते. उषा यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंबिय दोन्ही धर्मांत संतुलन राखत होते.
जेडी व्हान्स यांच्या विधानावर वादळी चर्चा
उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पत्नी उषाने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबतचे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आणि त्यांच्या टीकाकारांनी जेडी व्हान्स यांच्या विधानाला अवमानकारक आणि दुटप्पी म्हटले आहे. उषा व्हान्स या हिंदू धर्माचे आचरण करतात आणि त्यांनी धर्मांतराचा विचार केलेला नाही, असेही अनेकांनी सांगितले.
एका युजरने सोशल मीडियावर लिहिले की, उषा या कधीच नास्तिक नव्हत्या. पण जेडी व्हान्स नक्कीच होते. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, स्वतःचे राष्ट्राध्यक्षपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माणूस स्वतःच्या पत्नीलाही बाजूला सारेल, असे त्या बिचारीला कधीही वाटले नसेल. तर तिसऱ्या युजरने म्हटले की, व्वा, आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष उघडपणे त्यांच्या हिंदू पत्नीला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगत आहेत.
