पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेची बॅंक खाती कशा पद्धतीने सांभाळली जात आहेत, याची एक नवीच माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तपासातून पुढे आली आहे. शून्य शिल्लक (झिरो बॅलन्स) खात्यांची संख्या कमी दाखविण्यासाठी जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या अनेक खात्यांमध्ये संबंधित बॅंक कर्मचारी स्वतःच एक रुपया जमा करीत असल्याची माहिती समोर आली आहे. जनधन योजनेची आणि स्वतःची ‘कार्यक्षमता’ दाखवण्यासाठी अशा पद्धतीने पैसे जनधन योजनेकडे वळविण्यात येत असल्याचे तपासात दिसून आले. 30 पेक्षा जास्त राष्ट्रीयकृत बॅंका आणि प्रादेशिक बॅंकांकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत सुमारे 25 गावांतील लोकांची बॅंक खाती या तपासात तपासण्यात आली.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील बरैली जिल्ह्यातील पूर्णापूर गावातील कमलेश या घरकाम करणाऱ्या महिलेने ‘पंजाब अॅंड सिंध बॅंके’च्या स्थानिक शाखेत खाते काढले. जनधन योजने अंतर्गत हे खाते काढण्यात आले. २०१४ मध्ये काढण्यात आलेल्या या खात्यामध्ये कमलेश यांनी कधीही पैसे जमा केले नाहीत. घरातील आर्थिक स्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांना खात्यामध्ये पैसे भरणे जमलेच नाही. पण या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आपल्या खात्याचे पासबुक बॅंकेत जाऊन भरल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खात्यामध्ये चक्क एक रुपया जमा झाल्याचे दिसले. २९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली होती. ती कुठून आली, हे कमलेश यांना समजलेच नाही. पण आपण एकही रुपया न भरता त्यांना बॅंकेतील खात्यात रक्कम वाढली असल्याचे पाहून आनंदच झाला. त्यानंतर इंडियन एक्स्प्रेसच्या टीमने सहा राज्यांतील वेगवेगळ्या गावात जनधन योजने अंतर्गत काढलेल्या बॅंक खात्यांची माहिती गोळा केली. त्यामध्ये अनेक बॅंक खात्यात अशाच पद्धतीने एक रुपया जमा करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर विविध राष्ट्रीयकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांशी याबद्दल चर्चा केल्यावर त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटींवर वरील माहिती दिली. जनधन योजने अंतर्गत शून्य शिल्लक खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आमच्यावर वरून दबाव येत होता. शून्य शिल्लक खाते म्हणजे कोणताही ग्राहक ते खाते वापरतच नाही, असा अर्थ होतो आणि त्यामुळे जनधन योजनेचीच बदनामी होते. त्यामुळे या खात्यात काहीतरी व्यवहार झाला पाहिजे, असा दबाव आमच्यावर टाकण्यात आला. त्यातूनच मग आम्ही बॅंक कार्यालयाच्या देखभालीसाठी राखीव ठेवलेल्या निधीतून काही रक्कम या खात्यांकडे वळवली. काहींनी तर स्वतःच्या भत्त्यातील रक्कमही या खात्यांकडे वळवली. स्वतःची आणि योजनेची ‘कार्यक्षमता’ दाखवण्यासाठी या हालचाली करण्यात आल्या, असे या व्यवस्थापकांनी सांगितले.