मध्य प्रदेशातील इंदूरमधला शीतला माता बाजार हा मध्य प्रदेशातला प्रसिद्ध बाजार आहे. या ठिकाणी असलेल्या मुस्लिम व्यापाऱ्यांना मात्र आता अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण हे व्यापारी आता त्यांच्या दुकानात असलेल्या वस्तू विकण्यासाठी लोकांशी फोनवर संपर्क साधत आहेत किंवा सेल्समन म्हणून तरी नोकरी द्या अशी याचना करत आहेत. भाजपाच्या एका नेत्याने या व्यापाऱ्यांना बाजार सोडण्याची मुदत दिल्याने या व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
शीतला माता बाजार काय आहे?
मध्य प्रदेशातला शीतला माता बाजार म्हणजे असं ठिकाण आहे जिथे मुस्लिम सेल्समन आहेत, तसंच अनेक दुकानांचे मालक हिंदू आहेत. शिवणकाम केलेल्या वस्तूंसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. तसंच कापड व्यवसायही या बाजारात मोठ्या प्रमाणावर चालतो. लोकांची या बाजारात खरेदीसाठी कायमच गर्दी असते. रंगीबेरंगी कपडे, लहंगे, साड्या यांनी दुकानं सजून गेलेली असतात. मात्र इथल्या भाजपाच्या नेत्याने जो इशारा दिला आहे त्यामुळे मुस्लिम व्यापारी चिंतेत आहेत.
भाजपा नेते अकलव्य गौर यांनी दिला अल्टिमेटम
इंदूर भाजपाचे उपाध्यक्ष अकलव्य गौर यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांसाठी एक पत्रक काढलं आहे. २५ ऑक्टोबरच्या आत शीतला माता बाजार सोडा असं त्यांना सांगण्यात आलं आहे. अकलव्य गौर हे आमदार मालिनी गौर यांचे पुत्र आहेत. अकलव्य आणि त्याच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी २०२१ मध्ये एका कॅफेची तोडफोड केली होती. त्यावेळी अकलव्य गौर चर्चेत आले होते. मुनव्वर फारुखी हा कॉमेडियन या ठिकाणी हिंदूंची बदनामी करत होता असा आरोप त्यावेळी गौर यांनी केला होता. यानंतर हिंदू संघटनांनी मुनव्वर फारुखीच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता अकलव्य गौर यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना शीतला माता बाजार सोडण्याचा इशारा दिला आहे.
अकलव्य गौर यांनी नेमकं काय सांगितलं?
अकलव्य गौर यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “मागील दोन वर्षांपासून त्या भागात महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. तसंच त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. महिलांनी याबाबत पोलीस तक्रारीही केल्या आहेत. तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यानंतर त्यांनी माझी आई म्हणजेच आमदार मालिनी गौर यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुस्लिम व्यापाऱ्यांना मार्केट सोडण्याचा इशारा दिला आहे. गौर पुढे म्हणाले की आम्ही तिथल्या व्यापाऱ्यांसह बैठक घेतली होती त्यावेळी त्यांनी ठरवलं की अशा प्रकारचं गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींना आम्ही बाहेर जायला सांगू. तसंच त्यांच्या विरोधात कारवाई करु. आम्ही या प्रकरणात डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यास सांगितलं आहे.” असं गौर म्हणाले.
आमच्याच देशात आम्ही बहिष्कृत कसे?
दरम्यान अकलव्य गौर यांनी जो इशारा दिला आहे त्याचा फटका मुस्लिम व्यापाऱ्यांना बसला आहे. २५ वर्षांच्या एका नव्या व्यावसायिकाने सांगितलं की मी १० लाख रुपये कर्ज घेऊन साडीचं दुकान सुरु केलं. आता मला २५ ऑक्टोबरच्या आत दुकान बंद कऱण्यास सांगत आहेत. मी माझं कर्ज कसं काय फेडायचं? आता मी कर्जबाजारी होणार आहे. आपल्याच देशात आम्ही बहिष्कृत का? असा प्रश्न या व्यावसायिकाने विचारला. अशीच अवस्था इतर व्यापाऱ्यांचीही आहे असं इथल्या मुस्लिम व्यापाऱ्यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.