Ishaq Dar On Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि दोन्ही देशातील तणाव कमी झाला. मात्र, भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीसाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा हा मध्यस्थीचा दावा भारताने फेटाळून लावला.
दरम्यान, आता भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीबाबत पाकिस्तानने मोठी कबुली दिली असून भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी नेमकं कशी झाली? अमेरिकेने खरंच मध्यस्थी केली होती का? याचा खुलासा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी केला आहे. ‘अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने नाकारला होता’, असं इशाक दार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे इशाक दार यांनी ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्याची हवाच काढली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इशाक दार नेमकं काय म्हणाले?
“भारताने दोन्ही देशांमधील मुद्द्यांवर कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला सहमती दर्शवली नाही. जेव्हा पाकिस्तानने अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांच्यासमोर भारताबरोबर मध्यस्थीची भूमिका मांडली, तेव्हा मार्को रुबियो यांनीही म्हटलं होतं की भारताने नेहमीच पाकिस्तानबरोबरचे मुद्दे द्विपक्षीय असल्याची भूमिका मांडली आहे”, असं इशाक दार यांनी एका म्हटलं आहे.
“ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेने युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा तटस्थ ठिकाणी होईल असं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर रुबियो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्हाला सांगण्यात आलं की भारताने या प्रस्तावाला सहमती दर्शविली नाही”, असं इशाक दार यांनी म्हटलं आहे.
इशाक दार पुढे म्हणाले की, “आम्हाला तिसऱ्या पक्षाच्या सहभागाबाबत काही हरकत नाही. मात्र, भारत स्पष्टपणे भूमिका मांडतो की ही द्विपक्षीय बाब आहे. आम्हाला द्विपक्षीय बाबीला देखील हरकत नाही. पण संवाद व्यापक असले पाहिजेत. दहशतवाद, व्यापार, अर्थव्यवस्था, जम्मू आणि काश्मीर असे सर्व विषय असेल पाहिजेत. आम्ही कोणत्याही गोष्टीची भीक मागत नाही. आम्ही एक शांतताप्रिय देश आहोत आणि आमचा विश्वास आहे की संवाद हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. मात्र, त्यासाठी दोघांनाही वेळ द्यावा लागेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय दावा केला होता?
भारत आणि पाकिस्तानदरम्यान मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांची मिळून पाच लढाऊ विमाने पाडली होती, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केला होता. तसेच दोन्ही देश अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर होते. मात्र, मी ते युद्ध थांबवलं” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ३० हून अधिक वेळा भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे श्रेय घेत असताना त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे दावे गेले आहेत. बऱ्याचदा त्यांच्या दोन दाव्यांमध्ये तफावत आढळली आहे.
युद्ध रोखण्यात तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता : मोदी
ट्रम्प यांनी सातत्याने दावा केला की भारत-पाकिस्तान युद्ध रोखलं. मात्र, भारताने प्रत्येक वेळी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. भारताने म्हटलं आहे की दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बातचीत करून युद्धविरामाचा निर्णय घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट केलं होतं की भारत-पाकिस्तान संघर्ष रोखण्यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता. तो दोन देशांनी घेतलेला निर्णय होता.