Nobel Peace Prize Money: नोबेल समितीने शुक्रवारी नोबेळ शांतता पुरस्काराची घोषणा करत व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या पुरस्कारासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांची उपेक्षा झाली. ट्रम्प यांच्यामुळे यंदा शांतता पुरस्काराची चर्चा अधिक झाली. दरम्यान या प्रतिष्ठित पुरस्काराबरोबर मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेबद्दलही मोठी उत्सुकता असते. ही रक्कम किती असते, जाणून घेऊ.

स्वीडिश रसायनशास्त्र आणि संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार १९०१ मध्ये नोबेल पुरस्काराची स्थापना झाली. मानवजातीसाठी उपयुक्त असे काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना या पुरस्कारच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. एकूण सहा श्रेणींमध्ये हे पुरस्कार विभागलेले आहेत. शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र आणि आर्थिक विज्ञान यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

नोबेल शांतता पुरस्काराच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, बक्षीस म्हणून १.१ कोटी स्वीडिश क्रोनर (SEK) एवढी रक्कम दिली जाते. पुरस्काराच्या स्वरूपात विजेत्यांना सुवर्णपदक, वैयक्तिक सन्मानपत्रही देण्यात येते. (भारतीय चलनानुसार बक्षिसाची रक्कम सुमारे नऊ कोटी रुपयांहून अधिक होते.)

अल्फ्रेड नोबेल यांनी २७ नोव्हेंबर १८९५ रोजी आपल्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली होती. त्यांनी त्यांच्या संपत्तीमधील ३१ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (आज अंदाजे २.२ अब्ज स्वीडिश क्रोनर) सिक्युरिटीजमध्ये गुंतवले होते. या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न दरवर्षी अशा लोकांना बक्षीस म्हणून दिले जाते. (आजच्या तारखेला एका स्वीडिश क्रोनरची भारतीय चलनात ९.३१ रुपये इतकी किंमत आहे)

यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी जगभरातून ३३८ नामांकने आली होती, ज्यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता.

नोबेल पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते?

  • नोबेल शांतता पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि गोपनीय असते.
  • आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार उमेदवारांची नावे सुचविण्याची अंतिम मुदत ही ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी पर्यंत असते.
  • फेब्रुवारी ते मार्चदरम्यान नॉर्वेजियन नोबेल समितीकडून सर्व उमेदवारांच्या नावांची तपासणी करून, एक शॉर्ट लिस्ट तयार केली जाते.
  • एप्रिल ते ऑगस्टदरम्यान त्या संदर्भातील सखोल अहवाल तयार केले जातात आणि त्याबाबत तज्ज्ञ सल्लागार व्यक्तींचा सल्ला घेतला जातो.
  • सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस उमेदवारांच्या नावांची अंतिम शिफारस समितीकडे सादर केली जाते.
  • ऑक्टोबरमध्ये बहुमताने मतदान करून विजेता निवडला जातो आणि हा निर्णय अंतिम असतो, त्यावर अपील करता येत नाही.
  • १० डिसेंबर रोजी आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओस्लो येथे संबंधित व्यक्तीला नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला जातो.