फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर जल्लादना तुरूंगात बोलावण्यात येतं. कैद्यांचे पाय कसे बांधायचे, फाशीचा दोर कसा बांधायचा हे त्यावेळी ठरवण्यात येतं असं पवन जल्लाद यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. फाशी देण्याच्या १५ मिनिट पूर्वी त्यांना फाशी देण्यात येणार असल्याच्या ठिकाणी नेण्यात येतं. फाशीपूर्वीच्या एकूण प्रक्रियेला दीड तासांचा कालावधी लागतो, असंही त्यांनी सांगितलं. आरोपींना फाशी देण्यापूर्वी त्यांचे हात मागे बांधले जातात. तसंच दोन पोलीस शिपाई त्यांना फाशीच्या ठिकाणापर्यंत घेऊन येतात. फाशीघर किती लांब आहे, यावर ही सर्व प्रक्रिया किती वेळापूर्वी करायची हे ठरत असतं, असंही त्यांनी सांगितलं. फाशी देताना त्या ठिकाणी ४ ते ५ पोलीस शिपाई असतात. ते आरोपींना फाशी देण्याच्या ठिकाणी आणण्याच्या ठिकाणी उभं करतात. त्यावेळी कोणीही काहीही बोलत नाही. फाशीच्या एक दिवस पूर्वी एक मीटिंग घेण्यात येते. फाशीच्या ठिकाणी तुरूंग अधीक्षक, डिप्टी जेलर आणि डॉक्टरही उपस्थित असतात. फाशी देण्याची पूर्ण प्रक्रिया १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण होते. यादरम्यान, आरोपींचे हात बांधलेले असतात. तसंच त्यांचे पायही बांधले जातात. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कपडा घातला जातो. काम पूर्ण झाल्यावर जल्लाद लिव्हरकडे पोहोचतात. त्यानंतर तुरूंग अधीक्षक अंगठा दाखवतात. त्यानंतर लिव्हर खेचण्याची तयारी होते, असंही त्यांनी सांगितलं. आरोपींना उभं करण्यात येणाऱ्या ठिकाणी एक गोल निशाण तयार करण्या येतो. त्याच्या आतमध्ये आरोपींचे पाय असतात. जेल अधीक्षकानं सांगितल्यानंतर लिव्हर खेचलं जातं. फाशी दिल्यानंतर डॉक्टर त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे हृदयाचे ठोके तपासतात. त्यानंतर त्यांचं शरीर खाली उतरवलं जातं, असंही त्यांनी बोलताना सांगितलं.