मतदानासाठी जाताना मोदींनी ओपन जीपमधून जाऊन आचारसंहितेचा भंग केला असून मोदी कायदे मोडण्यात चतुरच नाही तर शातीर असल्याची टिका सुप्रसिद्ध मानवी हक्क व कायदेतज्ज्ञ असीम सरोदे व्यक्त केली आहे. तसेच मोदी आणि अमित शाह हे व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेले स्वयंसेवक असल्याचे सरोदे म्हणाले आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील राणिप येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्याआधी त्यांनी गंधीनगर येथील आपल्या आईच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मतदानाला जाताना मोदींनी ओपन जीपमधून जात छोटा रोड शो केला. यावरच सरोदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टिका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मतदान व मोदी-शाह’ या मथळ्याखाली सरोदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. मोदी हे कायदा मोडण्यात चतुर नाही तर शातीर असल्याची टिका सरोदे यांनी केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘पंतप्रधान खुल्या जीपमधून रोड शो करत मतदानाला गेले आणि तो रोड शो नव्हता असं ते आता म्हणतील कारण हा माणूस नुसता ‘चतुर’ नाही तर ‘शातीर’ आहे कायदे मोडण्यात.’ तसेच मोदींच्या गाडीचा वेग १० ते १५ किलोमीटर प्रती तास इतका मंद होता. आपण साधारणत: इतक्या कमी वेगाने जातो का असा सवाल सरोदे यांनी उपस्थित केला आहे.

मोदींनी केलेले हे शक्तीप्रदर्शन म्हणजे रोड शो होता आणि मोदींनी असं करुन आचारसंहितेचा भंग केला आहे असं सरोदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘नागरिकांनी समजून घ्यावे की मोदींचा तो रोड शोच होता आणि ते तसे करणे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणे आहे. एखादी गोष्ट गुन्हा आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्यामागचा ‘उद्देश’ बघणे महत्वाचे असते. साधारणतः जर ते खुल्या (ओपन) जीप मधून जात नाहीत आणि केवळ मतदान करण्यासाठी खुल्या जीपमधून जातात व शाहजोगपणाने सांगतात की मी रॅली काढली नाही तर ते खोटे बोलत आहेत. मोदी यांनी निवडणुक आचार संहितेचा भंग केला आहे,’ असं सरोदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मोदींच्या स्वागतासाठी मतदान केंद्राबाहेर उभ्या असलेल्या आणि नंतर मतदान केंद्रातील खोलीमध्ये उपस्थित असणारे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे वागणे उद्दामपणाचे होते असं सरोदे म्हणाले आहेत. ‘मी कायद्याच्या बापाला घाबरत नाही’ अशा उद्दामपणे शाह मतदान करण्याच्या खोलीत जाऊन थांबल्याचे सरोदे म्हणाले आहेत. ‘अमित शाह यांनी मतदान करण्याच्या खोलीत जाऊन थांबण्याचे काहीच कारण नव्हते आणि ते तिथले मतदार नसतांना तिथे जाणे म्हणजे प्रचाराचा भाग आहेच शिवाय ‘मी कायद्याच्या बापाला घाबरत नाही ‘ असा उद्दामपणा त्यांच्या वागणुकीत आहे. मोदी व शाह दोघांनीही निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे,’ असा आरोप सरोदेंनी केला आहे. तसेच याआधी २०१४ सालीही या मोदी-शहांची वर्तवणूक अशीच असल्याचे म्हणताना सरोदे यांनी ‘मागील २०१४ च्या निवडणुकीत मतदान केल्यावरही याच मोदींनी अशीच प्रचारात्मक बेकायदेशीरता असलेली कृती केली होती,’ असं म्हटलं आहे.

पोस्टच्या शेवटी सरोदे यांनी मोदी आणि शाह यांना स्वत:ची सेवा करणारे आणि काही व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेले स्वयंसेवक असल्याची टिका केली आहे. ‘हे वागणे म्हणजे काहीही विचारसंहिता या दोघांना माहिती नाही. हे स्वतःची सेवा करणारे व काही व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेले स्वयं सेवक आहेत. मुळात कायद्याच्या पळवाटा शोधून किंवा कायद्यात स्पष्टता नाही याचा गैरफायदा घेणारी प्रवृत्ती म्हणून मोदी व शाह यांची वागणूक समजून घेतली पाहिजे,’ असं म्हटलं आहे.

फेसबुक पोस्ट

दरम्यान देशभरात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. सात टप्प्यांपैकी तीन टप्प्यातील मतदान पार पडले असून १९ मे पर्यंत उर्वरित चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human right analyst adv asim sarode slams modi for roadshow on voting day
First published on: 24-04-2019 at 09:38 IST