पीटीआय, भुवनेश्वर/ कोलकाता : देशाच्या पूर्व किनारपट्टीकडे येत असलेले असनी चक्रीवादळ कमकुवत झाले आहे. मात्र त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे वळले असल्याने या राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवमानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असून हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी या प्रदेशांकडे वळले आहे. मात्र या चक्रीवादळाच्या प्रभावाने पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यांमधील काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पी. के. जेना यांनी सांगितले की, ओडिशा आपत्कालीन कृती दलाच्या ६० तुकडय़ा आणि अग्निशमन दलाची १३२ पथके राज्यातील किनारपट्टी भागांत विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या ५० तुकडय़ा पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत.

आंध्राच्या किनाऱ्यावर सुवर्णरंगी रथ

असनी चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रातून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी एक सोनेरी रंगाचा रथ वाहून आला. संताबोमाली किनारपट्टीजवळ वाहून आलेला हा रथ मूळचा म्यानमारमधील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हा रथ म्हणजे तरंगणारे पूजा मंदिर असून म्यानमारीमधील पॅगोडासारखा त्याचा आकार आहे. हा सुवर्णरंगी रथ दिसल्यानंतर स्थानिकांनी तो खेचत किनाऱ्यावर आणला, त्यानंतर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.