Hyderabad Mother kills two sons: “तुला मरायचं तर तू मर…”, पती-पत्नीच्या भांडणात पतीनं रागात हे वाक्य उच्चारल्यानंतर पत्नीनं त्याची अंमलबजावणी केली. डोकं चक्रावून टाकणारं असं एक प्रकरण हैदराबादमध्ये घडलं आहे. एका ३२ वर्षीय महिलेने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या करत जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने सहा पानांची सुसाइड नोट मागे सोडली आहे.

हैदराबादमधील जीदीमेटला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेचे नाव तेजस्विनी असे असून तिने नारळ सोलण्याच्या सुऱ्याने दोन मुलांचा खून केला आणि नंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांनी पुढे सांगितले की, तेजस्विनी ही गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यांशी संबंधित आजाराचा सामना करत होती. तिच्या अर्शित रेड्डी आणि आशिष रेड्डी या दोन मुलांनाही हाच आजार झाला होता. या आजारामुळे दोन्ही मुलांच्या डोळ्यात दर चार तासांनी ड्रॉप टाकावा लागत होता. ड्रॉप टाकला नाही तर त्यांना त्रास व्हायचा.

लहान मुलांच्या डोळ्यात दर चार तासांनी ड्रॉप टाकण्याच्या संघर्षाला तेजस्विनी विटली होती. हा त्रास तिला सहन होत नव्हता. ज्यामुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून गेली.

या कारणामुळे तेजस्विनी आणि तिच्या नवऱ्याचे वरचेवर भांडण होत असे. तेजस्विनीने सुसाइड नोटमध्ये लिहिल्यानुसार वादादरम्यान तिचा नवरा म्हणायचा की, ‘तुला मरायचे असल्यास तू मर’. या सततच्या भांडणालाही ती कंटाळली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुसाइड नोटमध्ये या त्रासाचा उल्लेख तेजस्विनीने केला आहे. यातून सुटका व्हावी, यासाठी तिने शहाळे सोलण्याच्या सुऱ्याने दोन्ही मुलांचा खून करून स्वतःही आत्महत्या केली. दरम्यान अर्शित आणि तेजस्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर लहान मुलगा आशिष जखमी अवस्थेत विव्हळत होता. रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.