हैदराबादमध्ये लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या टोळीतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. पोलिसांनी या टोळीकडून तब्बल ११ अर्भकांची सुटका केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी हे आंतरराज्यीय स्तरावर मुलांची तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.

लहान मुलांची तस्करी करणारी टोळी दिल्ली आणि पुणे परिसरात गरीब पालकांकडून मुले विकत घेत असत. त्यानंतर या लहान मुलांची विक्री ते दीड लाखांपासून ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये करत असत. या टोळीत सहभागी असलेले आरोपी विविध राज्यात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

माहितीनुसार, ही टोळी दिल्ली आणि पुण्यातून गरीब आणि बेघर लोकांकडून लहान बाळं विकत घेत होती. त्यानंतर ते लहान बाळं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातील अपत्यहीन जोडप्यांना लाखो रुपयांना विकत होते. या प्रकरणात आता हैदराबाद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या संदर्भातील वृत्त इडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

हेही वाचा : Video: “प्रियकराला घाबरविण्यासाठी महिला ट्रॅकवर उतरली आणि तेवढ्यात…”, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणासंदर्भात रचकोंडाचे पोलीस आयुक्त डॉ.तरुण जोशी यांनी सांगितलं की, २२ मे रोजी हैदराबादमधील मेडीपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीकडून मुलीच्या ‘विक्री’ बाबत तक्रार आली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन महिलांसह एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यांना अटक केली ते त्यावेळी बाळ विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता नवी दिल्ली आणि पुणे येथून आणलेली बाळं विकण्याचे मोठं रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत ५० बाळांची विक्री

पोलीस आयुक्त डॉ.तरुण जोशी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘ही टोळी नवी दिल्लीत राहणाऱ्या किरण आणि प्रीती नावाच्या व्यक्तींकडून आणि पुण्यात राहणाऱ्या कन्नय्या नावाच्या एका व्यक्तीकडून मुले विकत घेत होती. या टोळींनी या दोन शहरातून आतापर्यंत ५० मुलांची विक्री केल्याची माहिती दिली. या टोळीचे सदस्य एजंट आणि मध्यस्थांना पैसे देऊन ५० हजार ते १ लाख रुपये नफा देत होते. आता आम्ही ११ मुलांची सुटका करून त्यांना बालसुधारगृहात पाठवले आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.तरुण जोशी यांनी दिली.