नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत एखादा खास प्लॅन नक्कीच बनवला असेल. मात्र तुम्ही एकटे असाल आणि तुम्ही हैदराबादमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही विशेष प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. कारण येथील पोलिसांनीच एकट्याने नवीन वर्ष साजरं करण्यावर बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द न्यूज इन मिनीट या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हैदराबादमधील राछाकोंडा येथील पोलिसांनी शहरामधील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. यापैकी सर्वात चर्चेत असणारी सूचना एकट्या लोकांसंदर्भातील आहे. एकट्या पुरुषाला किंवा महिलेला कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ देऊ नये. कार्यक्रमांसाठी केवळ जोडप्यांना प्रवेश देण्यात यावा असं पोलिसांनी आयोजकांना सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये डीजेला सरसकट परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक आयोजकाला डीजेच्या परवानगीसाठी वेगळे परवानगी पत्र पोलिसांकडे सादर करावे लागणार आहे. तसेच ४५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या डीजेवर आणि आयोजकांवर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

इतकचं नाही तर नवीन वर्षाच्या स्वागताला म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी मद्यपींनाही इशारा दिला आहे. ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह प्रकरणामध्ये एखादी व्यक्ती सापडल्यास त्या व्यक्तीचे वाहन, वाहन परवाना जप्त करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना दहा हजारांचा दंड आणि सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते असा इसारा पोलिसांनी दिला आहे. दारू पिऊन गाडी चालवत स्वत:चा तसेच इतरांचा जीव धोक्यात टाकण्याऐवजी टॅक्सी सेवेचा वापर करा असा सल्ला पोलिसांनी दिला असून अशाप्रकारच्या सुचना कार्यक्रम स्थळी स्पष्टपणे दिसतील अशा पद्धतीने लावण्यात याव्यात असे आदेशही आयोजकांना देण्यात आले आहेत. पोलिसांची परवानगी असेल तरच कार्यक्रमाचे आयोजन करता येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिसांनी शहरामधील आयटी सेक्टरचा प्रभाव आणि तरुणांची संख्या लक्षात घेत कोणताही कार्यक्रम रात्री एक वाजल्याच्या पुढे चालू देऊ नये असंही आय़ोजकांना सांगितलं आहे. रात्री अपरात्री चालण्याऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचे सेवन केले जाण्याची शंका पोलिसांना असल्याचे असे आदेश देण्यात आल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad police says single people are not allowed at any new years eve parties scsg
First published on: 25-12-2019 at 09:43 IST