विद्यार्थ्यांची उग्र निदर्शने

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठाला भेट दिली

रोहित आत्महत्येचे पडसाद; इराणी, दत्तात्रय यांची भाजपकडून पाठराखण

हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर देशभरात मंगळवारी विद्यार्थ्यांनी उग्र निदर्शने केली. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांनी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांच्या तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणीही झाली. दिवसभर बचावात्मक पवित्रा घेतलेल्या भाजप नेत्यांनी संध्याकाळी मात्र दत्तात्रय तसेच इराणी यांची जोरदार पाठराखण करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांनीही राजीनामा देण्यास ठाम नकार दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रोहितच्या आईची भेट घेतली आणि नंतर शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या संघीय हस्तक्षेपाचा समाचारही घेतला.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठाला भेट दिली. रोहित सदस्य असलेल्या ‘आंबेडकर स्टुडंट्स युनियन’च्या सभासदांनाही ते भेटले. ‘या प्रकरणाला आम्ही राजकीय वळण देऊ इच्छित नाही,’ असे काही विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितले. मात्र रोहितच्या पालकांच्या भेटीस आलेले राहुल गांधी हे एकमेव केंद्रीय नेते असल्याने त्यांच्या छोटय़ा भाषणासही मोठा प्रतिसाद लाभला. या प्रकरणी दत्तात्रय व  विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव सूडबुद्धीने वागल्याचा आरोप करीत गांधी यांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

रोहितचा मृत्यू म्हणजे लोकशाहीचा खून असून या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य मोहंमद सलीम यांनीही सरकारवर टीका केली.

डॉ. आंबेडकर यांना त्रास देणारी काँग्रेस आता दलितांची तारणहार म्हणून मिरवीत आहे. न्यायालयाच्या सल्ल्यानुसार रोहितविरोधात कारवाई झाली होती. त्याच्या मृत्यूचा दलित हक्क चळवळीशी काहीही संबंध नाही असे भाजप सचिव पी. मुरलीधर राव यांनी सांगितले.

  • ‘तेलंगण जागृती यूथ फ्रंट’ने दत्तात्रय यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करीत परिसर दणाणून सोडला. ३७ निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • हैदराबाद विद्यापीठात आलेले भाजपचे प्रवक्ते प्रकाश रेड्डी यांनाही विद्यार्थ्यांच्या रोषाला तोंड देताना नाकीनऊ आले. त्यांच्या गाडीला विद्यार्थ्यांनी घेराव घातला तसेच खिडकीचे एक तावदानही फुटले.
  • दिल्लीत काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’ने मनुष्यबळ विकास मंत्रालयावर मोर्चा नेला. ’ आप पक्षाच्या विद्यार्थी शाखेने जंतर मंतर येथे निदर्शने केली.
  • मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातही ठिकठिकाणी निदर्शने झाली. पुण्यातील ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी हैदराबादमधील आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषण केले. दत्तात्रय यांचा पुतळाही अनेक ठिकाणी जाळला गेला.

हकालपट्टी आणि दलितांवरील बहिष्कार या विरोधात लढणाऱ्या रोहितला त्रास देण्यात आला, ज्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा.

राहुल गांधी,  काँग्रेस उपाध्यक्ष

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hyderabad suicide case get political aspect