रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे सांगणाऱ्या ‘रुपनवाल समिती’चा अहवाल हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जाळला. रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी ही कृती केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी संध्याकाळी विद्यापीठात हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी, गुरुवारी संध्याकाळी विद्यापीठातील विद्यार्थी आणि काही शिक्षक हे विद्यापीठ परिसरातील शॉपिंग कॉम्पेक्सजवळ एकत्र आले. या ठिकाणी रोहित वेमुलाचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी त्यांनी रुपनवाल समितीच्या अहवालाला विरोध दर्शवला.  यावेळी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या विद्यार्थी संघटनेचा नेता डोंथा प्रशांत याने सांगितले की, रोहितच्या मृत्यूप्रकरणाचा रुपनवाल समितीने दिलेला अहवाल हा अभाविप आणि भाजप यांच्या बाजूने तयार करण्यात आला असून यामध्ये भौतिक पुराव्यांचा विचार करण्यात आलेला नाही. रोहितनेही आपल्या शेवटच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे, “आम्हाला आता जगणे मुश्कील झाले असून, स्वाभिमानासाठी लढा देणे हाच गुन्हा बनला आहे”, याची दखलच या अहवालात घेण्यात आलेली नाही.

रुपनवाल समितीचा हा अहवाल राजकीयदृष्ट्या प्रेरित असून याप्रकरणी मुख्यत्वेकरून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. आरोपींवर याप्रकरणी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू पोडाईल अप्पा राव, केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती ईरानी, भाजप आमदार एन. रामचंद्रराव आणि अभाविपचा नेता एन. सुशीलकुमार, कृष्णा चैतन्य यांचा समावेश आहे. या आरोपींवर रोहित वेमुलाची मानहानी, छळवणूक, भेदभाव, अपमान आणि अन्याय केल्याचा आरोप असून रोहितचा मृत्यू हा संस्थात्मक खून असल्याचा पुन्हा एकदा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

यावेळी प्रा. के. लक्ष्मीनारायण म्हणाले, “समितीने रोहित दलित नसल्याचे प्रमाणपत्र देऊन आपल्या खोटे बोलण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून रोहितने मृत्यूला वैयक्तिक कारणांमुळे केलेली आत्महत्या सांगितले आहे. यावरून न्यायाधीशच खोटारडा असू शकतो याचा मी कधीही विचार केला नव्हता”.

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्या केली होती. याचे पडसाद विद्यापीठासह देशभर उमटले होते. त्यानंतर या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अशोककुमार रुपनवाल यांच्या एक सदस्यीय अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली. या समितीकडे या प्रकरणी घडलेल्या घटनांच्या नोंदी ठेवण्याचे आणि या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यांत या प्रकरणाचा अहवाल केंद्रिय मनुष्यबळ विकास खात्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर नुकताच तो प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये रोहित वेमुला हा दलित नव्हता तसेच त्याचा संस्थात्मक खून झाला नसून त्याच्या जीवनातील वैयक्तिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad university students burn roopanwal commission report on rohith vemula
First published on: 25-08-2017 at 17:30 IST