व्यापमं घोटाळ्यामध्ये एकामागून एक गूढ मृत्यू होत असल्यामुळे मला स्वतःलाही आता भीती वाटू लागली असल्याचे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. उमा भारती यांच्या या विधानामुळे मध्य प्रदेशमधील भाजप सरकार आणखी अडचणीत सापडले आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे याबद्दल आपले मत मांडणार असल्याचे उमा भारती यांनी पत्रकारांना सांगितले.
व्यापमं घोटाळ्यामध्ये मध्य प्रदेशात सातत्याने गूढपणे मृत्यू होत आहेत. सोमवारीच या प्रकरणी एका प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षकाचा सागरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याच दिवशी एक पोलीस कॉन्स्टेबल मृतावस्थेत आढळला. यापूर्वीही पत्रकार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह इतरांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. गूढ मृत्यूच्या या मालिकेमुळे या घोटाळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.
या पार्श्वभूमीवर उमा भारती म्हणाल्या, एकामागून एक मृत्यू होत असल्यामुळे मध्य प्रदेशात भीतीचे वातावरण आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबद्दल मलाही चिंता वाटते आहे. मी स्वतः मंत्री असले, तरी मलासुद्धा सध्या भीती वाटते आहे. माझ्या भावना मी लवकरच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2015 रोजी प्रकाशित
व्यापमं घोटाळा : मंत्री असूनही मला भीती वाटतीये – उमा भारती
व्यापमं घोटाळ्यामध्ये एकामागून एक गूढ मृत्यू होत असल्यामुळे मला स्वतःलाही आता भीती वाटू लागली असल्याचे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

First published on: 07-07-2015 at 11:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am also scared by deaths in vyapam scam says uma bharti