शाळकरी मुलांच्या खिशाला लावले ‘I Am Babri’ लिहिलेले बॅज; केरळमधला धक्कादायक प्रकार!

केरळमधील शाळकरी मुलांना आय एम बाबरी लिहिलेले बॅज घालायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

i am babri badge
केरळमध्ये एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही अज्ञात व्यक्ती हे बॅज लावताना दिसून आल्या. (फोटो : भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रम यांच्या ट्विटर हँडलवरून)

अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला १९ वर्ष पूर्ण झाल्याच्या घटनेची आठवण म्हणून केरळमध्ये शाळकरी मुलांच्या खिशाला ‘आय एम बाबरी’ असं लिहिलेले बॅज लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी केरळ पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक व्यक्ती सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात एसडीपीआयची सदस्य असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे केरळमध्ये खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तणावपूर्ण झालं आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने देखील या प्रकाराची दखल घेत पथ्थनमथित्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडिया टुडेनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

भाजपानं केला निषेध

केरळच्या पथ्थनमथित्ता जिल्ह्यामधल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एसडीपीआयचे नेते मुनीर इब्नु नझीर आणि इतर दोघांविरोधात सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पालक-शिक्षक संघटनेनं देखील पोलिसांत तक्रार दाखल केली असून काही अज्ञात व्यक्ती शाळेच्या समोर उभ्या राहून विद्यार्थ्यांना आय एम बाबरी लिहिलेले बॅज लावत होते, असं सांगितलं आहे. भाजपानं या सगळ्याच्या मागे एसडीपीआय असल्याचं म्हटलं आहे.

एसडीपीआय ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयची एक उपशाखा आहे. “या प्रकरणातील सहभागाबद्दल पीएफआयविरोधात कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. कम्युनिस्ट्स आणि पीएफआय यांच्यातले संबंध उघड आहेत. केरळ दुसरा सीरिया होण्याच्या मार्गावर आहे. मुलांच्या अधिकाराचं हनन होऊ लागलं आहे. केरळला दहशतवाद्यांचं केंद्र बनवण्यासाठी सरकार इतरांना मदत करत आहे”, अशा शब्दांत भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं घेतली दखल

दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्याची देखील मागणी आयोगानं केली आहे. तसेच, या प्रकरणी तीन दिवसांमध्ये काय कारवाई करण्यात आली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am babri badge kerala school students make to wear case registered pmw

ताज्या बातम्या