मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असा दावा त्याने केला असून मला लष्करी सेवेत पुन्हा रुजू व्हायचे आहे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पुरोहित आज (मंगळवारी) तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितला सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. पुरोहितने देश सोडू नये आणि कुठल्याही साक्षीदारास थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखवू नये असे कोर्टाने म्हटले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल ९ वर्षांनी पुरोहित तुरुंगातून बाहेर येणार आहे.

मंगळवारी विशेष न्यायालयात सुनावणीसाठी पुरोहितला हजर करण्यात आले. न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांनी पुरोहितची प्रतिक्रिया घेतली. ‘बॉम्बस्फोटात अडकवण्यात आल्याचे वाटते का?’ असा प्रश्न पुरोहितला विचारण्यात आला. यावर पुरोहित म्हणाला, यात वाटण्याचा संबंध नाही. हेच सत्य आहे, मला गुन्ह्यात अडकवलं. जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयावर पुरोहितने आनंद व्यक्त केला. मी या निर्णयावर समाधानी आहे. आता मी माझ्या दोन्ही कुटुंबात परतणार आहे. यातील पहिलं कुटुंब म्हणजे माझी पत्नी, तर दुसरं कुटुंब म्हणजे लष्कर असे त्याने सांगितले. दुसरीकडे विशेष न्यायालयाने पुरोहितला त्याच्या पत्नीस फोन करण्याची परवानगी दिली.

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहित आठ वर्ष आठ महिने तुरुंगात आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी जामीन देताना म्हटले होते की, बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल लागण्यास दीर्घ कालावधी लागू शकतो, अशा परिस्थितीत जामीन मिळावा, ही त्याची विनंती स्वीकारार्ह असल्याचे दिसते. याप्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवरील निर्णयासाठी हा निकाल पथदर्शी असल्याचे गृहीत धरण्यात येऊ नये असे खंडपीठाने स्पष्ट केले होते. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am framed in malegaon bomb blast case want return to army service says lt colonel shrikant prasad purohit
First published on: 22-08-2017 at 15:05 IST