कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्यासह अन्य प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून येणाऱ्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे कुख्यात गुंड छोटा राजन याने म्हटले आहे. इंडोनेशियाच्या पोलिसांनी छोटा राजनला विशेष कमांडो संरक्षण दिले आहे.
दाऊदसह अन्य टोळ्यांकडून येणाऱ्या धमक्यांबाबत वार्ताहरांनी विचारले असता, अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचे छोटा राजन याने सांगितले. रविवारी छोटा राजन याला इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आली होती.
छोटा राजनच्या जिवाला धोका असल्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे त्याला विशेष कमांडोंची सुरक्षा पुरविण्यात आली आहे, असे बालीचे पोलीस प्रवक्ते हैरी वियाण्टो यांनी सांगितले. राजनच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशा सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, तो परदेशी असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. राजनची वर्तणूक चांगली आहे, तो तणावाखाली असला तरी तसे निदर्शनास आणत नाही. झिम्बाब्वेला जायचे असल्याने मला सोडण्यात यावे, अशी विनंती त्याने सातत्याने चौकशी अधिकाऱ्यांकडे केली, असे बालीचे पोलीस आयुक्त रेनहार्ड नैनगोलन यांनी सांगितले. छोटा राजनची प्रकृती ठणठणीत आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. राजनला भारतात कधी पाठविणार असे विचारले असता वियाण्टो म्हणाले की, भारतीय अधिकाऱ्यांची बाली पोलीस प्रतीक्षा करीत आहेत, ते प्रथम राजन याची चौकशी करणार आहेत. भारतीय अधिकारी येथे आल्यानंतर त्याला भारतात पाठविण्याची प्रक्रिया समन्वयाने ठरविण्यात येईल, असेही वियाण्टो म्हणाले. इंटरपोलच्या देखरेखीखाली राजनला अटक करण्यात आली, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
दाऊदच्या धमक्यांना भीक घालत नाही- छोटा राजन
इंडोनेशियाच्या पोलिसांनी छोटा राजनला विशेष कमांडो संरक्षण दिले आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 29-10-2015 at 05:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont have fear about dawood chota rajan