बिहारच्या पाटणा या ठिकाणी आज विरोधी पक्ष एकवटले आहेत. नितीश कुमार यांच्या निमंत्रणानंतर शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्र येऊन बैठक करत आहेत. या सगळ्यावर स्मृती इराणींनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेसला हे ठाऊक आहे की ते एकटे मोदींना हरवू शकत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले आहेत. १९८४ चे दंगे, आणीबाणी, भारत तेरे टुकडे होंगेचे नारे हे सगळं करुन आता काँग्रेस मोहब्बतच्या दुकानाची भाषा करते आहे असं म्हणत स्मृती इराणींनी टीका केली आहे.
काय म्हटलं आहे स्मृती इराणींनी?
“काँग्रसेच्या छत्रछायेत काही असे नेते एकत्र आले आहेत ज्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीची हत्या होताना पाहिली. हे हास्यास्पद आहे की असे लोक एकजूट करत आहेत जे देशाला हे संकेत देत आहेत की त्यांची स्वतःची क्षमता काहीही नाही. मी काँग्रेसचे आभार मानते कारण कारण त्यांनी हे दाखवून दिलंय की काँग्रेस नरेंद्र मोदींना हरवण्यात अपयशी ठरतंय. त्यामुळेच त्यांना अशी मदत घ्यावी लागते आहे” असं म्हणत स्मृती इराणींनी काँग्रेसवर आणि जमलेल्या सगळ्या विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरही स्मृती इराणींनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ वेळा स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आहे. भारत आणि अमेरिकेत अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. सुरक्षा करार, सेमी कंडक्टर यांसारखे हे महत्त्वाचे करार आहेत. भारतात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे.
तसंच स्मृती इराणींनी असंही म्हटलं आहे की अमेरिकेच्या भेटीदरम्यान मोदींनी जे निर्णय घेतले आहेत ते निर्णय भारताच्या हिताच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.