स्वातंत्र्य दिनाचा सोहळा जम्मू काश्मीरमध्येही पार पडला, यावेळी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपली खंत बोलून दाखवली. आमच्या राज्यातील तरूणांच्या हाती १० रूपयांचं पेन, ५० रूपयांचं पेन किंवा १०० रूपयांचं पेन असायला हवं, त्याऐवजी त्यांच्या खांद्यावर ६ लाखांची बंदुक येते ही बाब अस्वस्थ करणारी आहे असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

तसंच सुप्रीम कोर्टाकडून ‘३५ अ’ प्रकरणाची याचिका पुन्हा एकदा फेटाळली जाईल याची खात्री असल्याचंही मुफ्ती यांनी म्हटलं आहे. आज झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या बोलत होत्या.

काश्मीरच्या खोऱ्यात हिंसाचार उसळणं ही बाब नवी राहिलेली नाही, इतकंच नाही तर अनेक तरूण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होत आहेत. काश्मीरमधील तरूण हे दहशतवादाच्या मार्गाला सहज जातात, त्यांना त्याचं काही विशेष वाटत नाही कारण त्यांची माथी भडकवली जात आहेत असं वक्तव्य सैन्य दल प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. तसंच अनेक दहशतवादी कारवायाही जम्मू काश्मीरमध्ये होत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही अनेक वर्षांपासून भिजत पडलेला आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी केलेलं वक्तव्य सूचक आहे. काश्मीरमधील विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केलं तर त्यांचे विचार प्रगल्भ होतील आणि ते अत्यंत सोपी वाटणारी आणि पुढे मरणाच्या वाटेवर नेणारी दहशतवादाची वाट हे तरूण धरणार नाहीत असंच मुफ्ती यांना सुचवायचं आहे. आपल्या भाषणात मेहबुबा मुफ्ती यांनी याचसाठी तरूणांच्या हातात १० रूपयांच्या पेनपासून १०० रूपयांच्या पेनपर्यंत असलं तरीही हरकत नाही असं म्हटलंय आणि त्यांच्या खांद्यावर येणाऱ्या ६ लाख रूपये किंमतीच्या बंदुकीबाबत खंत व्यक्त केली आहे.