“मी हा घोटाळा (अयोध्या राम मंदिर बांधकामाबाबतचा) उघड केल्यानंतर कारवाईसाठी तीन दिवस केंद्र सरकार व भाजपाची वाट पाहिली. मी असं समजतो की, भाजपाचा विश्वास हा भगवान रामावर नव्हे तर मालमत्ता विक्रेते/ भ्रष्टाचाऱ्यांवर आहे. मी हे प्रकरण न्यायालयात नेण्याची तयारी करत आहे.” असं आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग म्हणाले आहेत.

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी आज(बुधवार) पत्रकारपरिषद घेत, पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.

संजय सिंग म्हणाले की, “ज्या कराराबद्दल बोलले जात आहे तो करार १८ मार्च २०२१ रोजीच रद्द करण्यात आला होता. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टमध्ये जो जमीन घोटाळा झाला, भाजपा त्यावर कारवाई करण्याऐवजी मालमत्ता विक्रेत्यांच्या बाजूने उभा राहिली आहे.”

तसेच, “मगंळवारी काही कागदपत्र आमच्या हाती लागली, ज्यावरून हे सिद्ध होतं की भाजपाचा विश्वास रामावर नाही, भ्रष्टाचाऱ्यांवर आहे. भाजपा व चंपत राय सतत सांगत आहेत की, मालमत्ता विक्रेत्याशी २०११ मध्ये करार झाला, नंतर २०१९ मध्ये झाल्याचं सांगितलं. ज्या कराराबाबत ते बोलत आहेत, तो १८ मार्च २०२१ रोजीच रद्द झालेला आहे आणि याचे प्रतिज्ञापत्र माझ्या हातात आहे. जमिनीचा करार दोन कोटी रुपयांमध्ये झाला होता. ज्यासाठी ५० लाख अगोदर दिले गेले. या व्यवहारात पहिला पक्ष कुसुम पाठक, हरीश पाठक आहे. ज्या ९ लोकांबरोबर करार झाला आहे, त्यामध्ये राम सिंह, विश्व प्रताप सिंह, मनिष कुमार, सुबेदार दुबे, बलराम यादव, राजेंद्र प्रसाद, रविंद्र कुमार दुबे, सुल्तान अन्सारी आणि राशीद हुसैन यांचा समावेश आहे. यामध्ये रवी मोहन तिवारीचे नाव देखील समाविष्ट आहे.” अशी देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

“…माझी हत्या झाली तरी बेहत्तर”, घरावर हल्ला झाल्यानंतर संजय सिंग यांचं भाजपाला जाहीर आव्हान

दरम्यान, संजय सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचेही समोर आले आहे. संजय सिंग यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच, संजय सिंग यांनी भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टने जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंग यांनी केली आहे.